खांदेश्वर स्थानकात अतिक्रमण
By Admin | Updated: July 14, 2015 22:51 IST2015-07-14T22:51:36+5:302015-07-14T22:51:36+5:30
खांदेश्वर रेल्वेस्थानकाला सध्या फेरीवाल्यांनी वेढा घातला आहे. सायंकाळी ट्रेन आली की फेरीवाले ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्याने ओरडतात, इतकेच नव्हे

खांदेश्वर स्थानकात अतिक्रमण
- अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली
खांदेश्वर रेल्वेस्थानकाला सध्या फेरीवाल्यांनी वेढा घातला आहे. सायंकाळी ट्रेन आली की फेरीवाले ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्याने ओरडतात, इतकेच नव्हे तर प्रवेशद्वारावर बसत असल्याने प्रवाशांना येता-जाता अडचणीचे ठरत आहे.
पनवेलच्या अगोदर खांदेश्वर रेल्वेस्थानक असून या ठिकाणी कामोठे, कळंबोली, तळोजा, खांदा वसाहत आणि नवीन पनवेलमध्ये राहणाऱ्यांची वर्दळ असते. हे स्थानक त्यांना वाहतुकीसाठी सोयीचे असल्याने बहुतांशी प्रवासी याच स्थानकात उतरतात. दररोज सात हजार प्रवासी या स्थानकावरून प्रवास करीत असून पाच लाख रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळते. दिवसेंदिवस स्थानकातील प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे स्थानकावरून कामोठे वसाहत, नवीन पनवेलकरिताही एनएमएमटीच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. स्थानकात प्रवाशांची संख्या वाढत असली तरी अनेक सुविधांचा अभाव आहे.
फेरीवाले उरलेला माल स्थानकातच टाकत असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे. त्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे रेल्वेतील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. गर्दीच्यावेळी पाकीटमारी, सोनसाखळी, मोबाइल चोरीच्या घटनाही याठिकाणी घडल्या आहेत.
सुरक्षारक्षकांचा कानाडोळा
- नवी मुंबईतील कोणतेच रेल्वेस्थानक रेल्वे प्रशासनाकडे वर्ग करण्यात आलेले नाही. त्यामुळे इतर स्थानकांप्रमाणे खांदेश्वर रेल्वेस्थानक परिसर सुध्दा सिडकोच्याच अधिपत्याखाली आहे. या ठिकाणची सुरक्षितता, अतिक्र मण होऊ नये या उद्देशाने १0 ते १२ सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परंतु हेच सुरक्षारक्षक फेरीवाल्यांकडून चिरीमिरी जमा करीत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
सिडको, लोहमार्ग पोलीस, कामोठे पोलीस, वाहतूक शाखा, अतिक्र मण विभाग यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला आहे, तरी त्याची कोणीच दखल घेतलेला नाही.
- भूपी सिंग, प्रभारी स्थानक प्रबंधक
फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबाबत बांधकाम नियंत्रण विभागाला लेखी कळविले आहे. येत्या एक-दोन दिवसात या ठिकाणी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आहे.
- वाय.व्ही. गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी, सिडको