अतिक्रमण : तक्रारीला केराची टोपली
By Admin | Updated: March 10, 2015 00:16 IST2015-03-10T00:16:17+5:302015-03-10T00:16:17+5:30
वागळे इस्टेट अंबिकानगर येथील गुरुकृपा चाळीतील वाढते अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामाबाबत वारंवार तक्रार करुनही अतिक्रमण विरोधी

अतिक्रमण : तक्रारीला केराची टोपली
ठाणे : वागळे इस्टेट अंबिकानगर येथील गुरुकृपा चाळीतील वाढते अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामाबाबत वारंवार तक्रार करुनही अतिक्रमण विरोधी पथकाने त्याकडे काणाडोळा केला आहे. या अनधिकृत बांधकामाचे पुरावे देऊनही त्यावर कारवाई का केली जात नाही, असा सवाल येथील रहिवाशांनी महापौर संजय मोरे यांना पत्राद्वारे केला आहे.
या पत्रात म्हटले आहे की, त्यांच्या घरासमोर राहणारे राम भोईर आणि राजीव गांधी नगर चाळ क्र. एक येथील प्रकाश भोसले यांनी त्यांच्या घरांच्या बांधकामासाठी अतिक्रमण करुन अनधिकृत बांधकाम केले आहे. ही गल्ली अरुंद आणि सार्वजनिक असून गल्लीतच एक मंदीरही आहे. येथे होणारे नविन बांधकाम, वाढत्या गॅलरीज, गटारावरील शिडया, गॅलरीमध्ये खोल्या, गॅलरीची लांबी आणि शौचालयाच्या टाक्यांचे सर्व नियम धाब्यावर बसवून रस्त्यांवर अनधिकृत बांधकाम केले आहे. यापूर्वीही कृष्णा लोखंडे यांच्या विरोधात ३१ डिसेंबर २००५ रोजी त्यांनी दोन वेळा अतिक्रमण विभागाकडे तक्रार केली होती.
मात्र, आजपर्यंत त्याची कोणतीही दखल घेतली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर ठाणे महापालिकेच्या रायलादेवी प्रभाग समितीच्या प्रभाग अधिकाऱ्यांकडे १० फेब्रुवारी २०१५ रोजी तर २५ फेब्रुवारी रोजी अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांकडे आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ विभागाच्या उप अभियंत्यांकडे त्यांनी तक्रार केली. परंतु, कोणत्याही विभागाकडून योग्य ती कारवाई केलेली नाही.
दरम्यान, अतिक्रमण विभागाने त्यांना ५ फेब्रुवारी रोजी नोटीस बजावूनही बांधकाम कर्त्यांनी त्यांचे काम चालूच ठेवले आहे. भविष्यात एखादी नैसर्गिक आपत्ती आल्यास किंवा एखादी दुर्घटना घडल्यास तिथून बाहेर पडण्यासाठी मार्ग उपलब्ध होणार नाही. त्यामुळे अतिक्रमण विभागाने कारवाई करुन या अनधिकृत बांधकामांना आळा घालावा, अन्यथा अतिक्रमण निर्मूलन विभागच संशयास्पद ठरेल. असेही तक्रारदारांनी म्हटले आहे.
(प्रतिनिधी)