भाईंदर डम्पिंग ग्राउंडला अतिक्रमणांचा विळखा
By Admin | Updated: May 3, 2015 23:04 IST2015-05-03T23:04:46+5:302015-05-03T23:04:46+5:30
पालिका हद्दीतील घनकचऱ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी २००४ मध्ये केंद्र शासनाने उत्तन येथील धावगी-डोंगरी परिसरात दिलेल्या ७५ एकर जागेवर

भाईंदर डम्पिंग ग्राउंडला अतिक्रमणांचा विळखा
भार्इंदर : पालिका हद्दीतील घनकचऱ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी २००४ मध्ये केंद्र शासनाने उत्तन येथील धावगी-डोंगरी परिसरात दिलेल्या ७५ एकर जागेवर अतिक्रमणाचा विळखा वाढतो असतानाही व यासंबंधी अनेक तक्रारी येऊनसुद्धा प्रशासन मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
२००४ मध्ये केंद्र शासनाकडून उत्तन येथील धावगी-डोंगरी येथे ७५ एकर जागा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आली. त्या वेळी सुमारे दीड एकरावर अतिक्रमण असताना पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर ते सतत वाढत गेले. सध्या हे अतिक्रमण सुमारे २५ एकरांवर झाले आहे. दरम्यान, २००८ मध्ये महासभेने त्या जागेवर मे. हँजर बायोटेक प्रा.लि. या गुजरातमधील कंपनीला बीओटी (बांधा-वापरा-हस्तांतर करा) तत्त्वावरील घनकचरा प्रकल्प सुरू करण्यास मान्यता दिली. अतिक्रमणाखेरीज उर्वरित सुमारे ५० एकर जागेवर प्रकल्प सुरू करण्यात आल्याने तेथील ग्रामस्थांनी आरोग्याच्या कारणास्तव त्या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवून जनआंदोलन पुकारले होते.
पुढे जिल्हाधिकाऱ्यांनी २१ आॅक्टोबर २०१३ रोजी पालिकेला वसई तालुक्यातील सकवार येथे १३ हेक्टर १० एकर जागा डम्पिंग ग्राउंडसाठी दिली आहे. नियोजित डम्पिंग ग्राउंडचा मार्ग मोकळा झाला असला तरी धावगी-डोंगरी येथील जागेवर मोेठे अतिक्रमण झाले आहे.