कर्मचाऱ्यांना २ महिन्यांचे वेतन नाही
By Admin | Updated: May 14, 2015 00:01 IST2015-05-14T00:01:08+5:302015-05-14T00:01:08+5:30
पालघर जिल्हा नियोजन तसेच विकास समितीची बैठक नुकतीच येथे झाली. या बैठकीत २०१५-१६ या आर्थिक वर्षात विविध योजनांच्या प्रारूप विकास

कर्मचाऱ्यांना २ महिन्यांचे वेतन नाही
दीपक मोहिते, वसई
पालघर जिल्हा नियोजन तसेच विकास समितीची बैठक नुकतीच येथे झाली. या बैठकीत २०१५-१६ या आर्थिक वर्षात विविध योजनांच्या प्रारूप विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली. कृषिक्षेत्रासह विविध विभागांच्या योजनांसंदर्भात चर्चा करण्यात आली. समितीच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले असले तरी जिल्हा प्रशासनाची गाडी अद्याप रुळावर आलेली नाही. योजना राबविणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना गेले दोन महिने वेतन मिळालेले नाही. त्यामुळे या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन यावर चर्चा होणे गरजेचे होते.
पालघर जिल्हा अस्तित्वात येऊन वर्षाचा कालावधी लोटत आला आहे. गेल्या १० महिन्यांत अनेक घोषणा जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या. परंतु, प्रत्यक्षात विकासकामे झाली नाहीत. प्रशासनाची घडीच अद्याप बसू न शकल्यामुळे प्रशासकीय कामकाजाला गती मिळू शकली नाही.
या बैठकीत वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी निरनिराळ्या विभागांच्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या प्रश्नांवर चांगलेच फैलावर घेतले. या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पुरेसा कर्मचारीवर्ग नसल्याबाबत उपस्थित लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होता. त्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन जिल्ह्याच्या विविध विभागांसाठी जागा निवडताना आम्हाला विश्वासात घेतले का, असा प्रश्न उपस्थित केला.
या सभेला अनेक विभागांचे अधिकारी गैरहजर असल्याबाबत सर्वांनीच नाराजी व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी यावेळी उपस्थितांनी केली.