कर्मचारी मोर्चात, स्वच्छतेचा बोजवारा
By Admin | Updated: July 17, 2015 02:30 IST2015-07-17T02:30:59+5:302015-07-17T02:30:59+5:30
गेल्या पंधरा दिवसांपासून पालिका उपायुक्त रणजीत ढाकणे यांच्या विरोधात सुरु असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने स्थानिक स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे

कर्मचारी मोर्चात, स्वच्छतेचा बोजवारा
मुंबई : गेल्या पंधरा दिवसांपासून पालिका उपायुक्त रणजीत ढाकणे यांच्या विरोधात सुरु असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने स्थानिक स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. ‘लेप्टो’सारख्या भयंकर आजाराची साथ पसरली असताना हे कर्मचारी स्वत:ची कामे टाकून मोर्चात हजेरी लावत असल्याने पालिका आयुक्तांनी सर्वप्रथम या आंदोलकांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात येत आहे.
दोन आठवड्यांपूर्वी म्हणजे दोन जुलै रोजी ढाकणे यांनी स्वच्छतेच्या विषयावरुन आर मध्य विभागाच्या विजय मानकर यांच्या श्रीमुखात भडकविली. ज्याच्या विरोधात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ‘कामबंद’ आंदोलन सुरु केले. गेल्या पंधरा दिवसांपासून कधी पालिका आयुक्तालय तर कधी स्थानिक पालिका विभागासमोर हे कर्मचारी मोर्चा घेऊन जात आहेत. या सगळ्याचा परिणाम स्थानिक स्वच्छतेकडे होत असल्याचे विभाग क्रमांक २८ च्या नगरसेविका डॉ. गीता यादव यांचे म्हणणे आहे. माझ्या वॉर्डामध्ये झोपडपट्टी विभाग मोठ्या प्रमाणात आहे. ज्याच्या शेजारी पोईसरचा नाला आहे. ज्यात डुक्कर आणि मोठ्या प्रमाणात उंदीर आहेत. ज्यामुळे स्थानिकांना लेप्टोची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विभागात एकाही पालिका अधिकाऱ्याने ढुंकूनही पाहिलेले नाही. लोकांच्या आयुष्यापेक्षा मोर्चात वेळ घालविणे अधिक प्रिय वाटते, जे माणुसकीला काळिमा फासणारे आहे. त्यामुळे या लोकांवरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे करणार असल्याचेही यादव म्हणाल्या.