Join us  

कर्मचाऱ्यानेच दिली लुटीची टीप...; ताडदेव हत्या प्रकरणी एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 10:32 AM

लुटीनंतर आरोपीने त्याच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर केल्याचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ताडदेवमधील व्यावसायिक लूट आणि हत्या प्रकरणात कर्मचाऱ्यानेच लुटीची टीप दिल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. ताडदेव पोलिसांनी सुमित भगवानदास टटवाल (३७), या कर्मचाऱ्याला बुधवारी अटक केली आहे. लुटीनंतर आरोपीने त्याच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर केल्याचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. 

न्यायालयाने त्याला २३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे,  तसेच गुन्हा करणाऱ्या त्रिकुटाला ताब्यात घेत अधिक तपास सुरू आहे. ताडदेव येथील युसूफ मंजिल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर इमिटेशन ज्वेलरी व्यावसायिक मदन अग्रवाल हे त्यांची पत्नी सुरेखा यांच्यासोबत राहायचे. अग्रवाल यांचे काळबादेवी परिसरात दुकान आहे. यावर्षीच सुमित त्यांच्याकडे नोकरीला लागला होता. तो मूळचा राजस्थानचा रहिवासी असून, मालाड परिसरात राहायचा. पत्नी आणि मुलगा गावी राहण्यास आहे.  

सुमितनेच दिलेल्या टीपनंतर, त्रिकुटाने रविवारी लुटीचा डाव आखला. अग्रवाल नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी घरचा दरवाजा उघडताच दरवाजाबाहेर उभ्या असलेल्या तीन जणांनी त्यांना आत ढकलले. लुटारूंनी अग्रवाल यांच्यासह त्यांच्या पत्नीचे हातपाय बांधून आणि तोंडावर चिकटपट्टी लावून घरातील किंमती ऐवजाची लूट केली. याचमध्ये त्यांचा पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर, त्रिकुट टॅक्सीने पसार झाले.  

पोलिसांसमोर आरोपींपर्यंत पोहोचण्याचे आव्हान होते. पोलिस उपायुक्त अकबर पठाण, सहायक पोलिस आयुक्त शोभा भिसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने  सुमितला अटक केली.

तपास सुरू 

गुन्ह्याची उकल करण्यात यश आले असून, एकाला अटक करण्यात आली आहे. पथक अन्य आरोपींच्या मागावर असून, अधिक तपास सुरू असल्याचे पोलिस उपआयुक्त अकबर पठाण यांनी सांगितले. 

गुन्ह्यानंतर खात्यात पैसे     

गुन्हा केल्यानंतर आरोपींकडून टीप देणाऱ्या सुमितच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर झाल्याचेही समोर आले. त्याबाबत अधिक तपास सुरू आहे. घटनेच्या आदल्या दिवसापर्यंत तो नियमित कामावर येत होता. या घटनेनंतर दुकान बंद ठेवण्यात आले होते.

 

टॅग्स :गुन्हेगारी