अत्याधुनिक दळणवळण सुविधेवर भर

By admin | Published: January 6, 2015 01:06 AM2015-01-06T01:06:05+5:302015-01-06T01:06:05+5:30

महापालिका क्षेत्रात अत्याधुनिक दळणवळण सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. मेट्रो, जलवाहतुकीसही प्राधान्य दिले जाईल.

Emphasis on the state-of-the-art communication facility | अत्याधुनिक दळणवळण सुविधेवर भर

अत्याधुनिक दळणवळण सुविधेवर भर

Next

नवी मुंबई : महापालिका क्षेत्रात अत्याधुनिक दळणवळण सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. मेट्रो, जलवाहतुकीसही प्राधान्य दिले जाईल. लोकाभिमुख व पारदर्शी कारभार करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे मत पालिकेचे नवनियुक्त आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केले आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या नवीन मुख्यालयात मावळते आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांच्याकडून वाघमारे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. शहराच्या विकासाविषयी भूमिका मांडताना त्यांनी सांगितले की, नवी मुंबईत वाहतुकीची सुविधा अधिक चांगली करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. आवश्यक तेथे उड्डाणपूल तयार केले जातील. मेट्रो रेल्वेसारखे प्रकल्प तसेच जलवाहतुकीविषयीही प्रयत्न करून भविष्यात वाहतुकीची समस्या जाणवणार नाही यावर लक्ष केंद्रित केले जाईल असे त्यांनी सांगितले. शहरात उद्यानांची संख्या भरपूर आहे. तलाव व पाण्याचे इतर नैसर्गिक स्रोतही आहेत. या सर्वांचा विकास करून पर्यावरणाचा समतोल राखण्यास प्राधान्य देण्यात येईल. महापालिकेचा कारभार लोकाभिमुख व पारदर्शक राहील याकडे लक्ष देण्यात येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाविषयी माहिती दिली.
मावळते आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनीही नवी मुंबईमध्ये कमी काळात चांगले काम करता आले. अनेक रखडलेले प्रकल्प पूर्ण करता आले. कामकाजामध्ये सुधारणा करता आली. लोकप्रतिनिधी व प्रशासनातील सहकाऱ्यांचेही चांगले सहकार्य लाभल्याचे मत व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकरिता ई - स्कॉलरशिप प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल त्यांना इ इंडिया पुरस्काराने गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)

नवीन आयुक्तांच्या कार्यकाळावर दृष्टिक्षेप
दिनेश वाघमारे हे १९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवून आयआयटी खरगपूर येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये एम. टेक पदवी संपादन केली आहे.
आतापर्यंत त्यांनी रत्नागिरीमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी, वाशिम व यवतमाळ येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, बुलढाणा येथे जिल्हाधिकारी, नागपूर सुधार न्यासचे अध्यक्ष, महाराष्ट्र लघुद्योग विकास मंडळाचे सदस्य सचिव, अमरावतीचे विभागीय सचिव म्हणून काम केले आहे.
बुलढाणामध्ये असताना पोस्ट साक्षरता अभियानामध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल उपराष्ट्रपतींच्या हस्ते सत्येन मित्रा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. युरोपमधील ब्रॅडबोर्ड विद्यापीठात विकास व प्रकल्प नियोजन शाखेत नागरी जलपुरवठा क्षेत्र यामध्ये त्यांनी मानांकनासह पदव्युत्तर पदवी संपादन केलेली आहे.

Web Title: Emphasis on the state-of-the-art communication facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.