Join us  

मॉल खुले झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स साहित्याच्या खरेदीवर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 3:32 PM

दागिने, घड्याळे, होम अ‍ॅक्सेसरीजलाही पसंती

मुंबई : कोरोना काळात मुंबई शहर आणि उपनगरातील मॉल खुले झाल्यानंतर येथील खरेदीसाठी मोठी झुंबड उडेल; असा व्यक्त करण्यात आलेला आशावाद काही प्रमाणात का होईना खरा ठरत आहे. कारण मॉल्समधील चित्र पाहिल्यानंतर गेल्या महिन्याभरात मॉलमध्ये दाखल होणा-या ग्राहकांचे प्रमाण वाढले असून, येत असलेल्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या खरेदीवर भर देत असल्याचे चित्र आहे. या व्यतीरिक्त दागिने, कपडे यांच्यासह किरणा मालाची खरेदी देखील मॉलमध्ये येणारे ग्राहक करत असून, यात उत्तरोत्तर वाढ होईल, असाही आशावाद व्यक्त केला जात आहे.

कुर्ला येथील फिनिक्स मॉल असो. लोअर परळ येथील फिनिक्स मॉल असो. किंवा पश्चिम उपनगरातील कोणतेही मॉल असोत. येथील मॉलमध्ये आता महिनाभरानंतर काही प्रमाणात का होईना खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. मॉलमध्ये येणारे बहुतांशी ग्राहक हे इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या खरेदीसाठी येत आहेत. यात मोबाईलसह उर्वरित घटकांचा समावेश आहे. या सोबतच कपडे खरेदी करण्यासाठीदेखील मोठया प्रमाणावर ग्राहक दाखल होत आहे. सोबत येथील रिटेल स्टोरमध्ये अन्न धान्य असो वा अन्य किरणा मालाच्या साहित्यासाठी ग्राहक  मॉलमध्ये दाखल होत आहेत. मॉलमध्ये दाखल होणा-या वयोगटाचा विचार केला तर २० ते ४० वयोगटातील व्यक्ती यात अधिक आहेत. विशेषत: २५ ते ४० वयोगटातील व्यक्ती मॉलमध्ये मोठया संख्येने येत असून, यातील बहुतांशी कपडे आणि किरणा खरेदी करण्यासाठी दाखल होत आहेत. या व्यतीरिक्त २० ते २५ वयोगटातील तरुण आणि तरुणीदेखील मोठया संख्येने दाखल होत असून, मॉलमध्ये दाखल होणा-या महिला वर्गाची संख्याही मोठी आहे.

फिनिक्सच्या पश्चिम विभागाचे संचालक राजेंद्र काळकर यांनी सांगितले की,  मॉल्समध्ये ग्राहकांची गर्दी वाढत आहे. इलेक्ट्रॉनिक्स साहित्याची खरेदी वेगाने होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण ७८ ते ८० टक्के आहे. दागिने, घड्याळे आणि इतर वस्तू देखील खरेदी केल्या जात आहेत. हे प्रमाण मागील वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे ६० टक्के आहे. होम अ‍ॅक्सेसरीज मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या विक्रीच्या तुलनेत ४५ तर ५० टक्के आहे.  ग्राहक मॉलमधील सुरक्षित वातावरणाला प्राधान्य देत आहेत. कार्यालये उघडल्यामुळे फॅशन आणि पादत्राणे यावर जोर दिला जात आहे. आता उत्सव साजरे होणार नसले तरी जर ग्राहक आलेच तर तयारी सुरु झाली आहे. अन्न आणि शीतपेये यासारख्या घटकांना परवानगी नाही. मॉलमध्ये फूड कोर्ट सुरू करा, अशी विनंती केली जाणार आहे. मात्र अद्याप याबाबत पाऊले उचलण्यात आली नाहीत. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईखरेदीलॉकडाऊन अनलॉक