Join us  

मुंबईतील सहा बड्या हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 3:54 AM

अफवा असल्याचे स्पष्ट

मुंबई : पश्चिम उपनगरातील सहा उच्चभ्रू हॉटेल बॉम्बने उडवून देण्याचा मेल संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापनाला आल्याने सुरक्षा यंत्रणांची धावपळ झाली. बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) तसेच स्थानिक पोलिसांनी संबंधित हॉटेलचा परिसर पिंजून काढल्यानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. मेल पाठविलेला आयपी अ‍ॅड्रेसचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पश्चिम उपनगरातील द लीला, सी प्रिन्सेस, द पार्क, रमाडा इन, सहारा स्टार, सी अ‍ॅण्ड सॅण्ड या हॉटेलच्या ई-मेल आयडीवर रविवारी सकाळी अज्ञाताकडून एक संदेश पाठविण्यात आला. हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला असून स्फोट घडविण्यात येणार आहे, असा मजकूर त्यामध्ये होता. त्यांनी तातडीने नियंत्रण कक्षाला कळविले. त्यानंतर संबंधित सहाही हॉटेलमध्ये स्थानिक पोलीस आणि बीडीडीएसचे पथक दाखल झाले. हॉटेल व त्याचा परिसर पिंजून काढला. त्यामध्ये एकही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने पोलिसांसह संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापनाने समाधानाचा सुस्कारा सोडला. मेलद्वारे अफवा पसरविल्याचे स्पष्ट झाले. अज्ञात आयडीवर हे मेल पाठविण्यात आले असून त्याचा आयपी अ‍ॅड्रेस शोधत आहोत, असे पोलीस प्रवक्ते उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबईस्फोटके