निधी पेडणेकर, मुंबई
प्रभादेवी येथील एल्फिन्स्टल पूल पाडकामाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या पुलाचं पाडकाम गणेशोत्सवानंतर केलं जाणार आहे. येत्या १० सप्टेंबरपासून पूल वाहतुकीसाठी बंद होणार असल्याची माहिती मुंबई वाहतुक विभागाकडून देण्यात आली आहे. संभाव्य प्रकल्पग्रस्तांच्या तीव्र विरोधानंतर या पुलाचे पाडकाम पुढे ढकलण्यात आले होते. या पुलाच्या पाडकामासोबतच परिसरातील काही इमारतींचं देखील पाडकाम केलं जाणार आहे. या इमारतीतील रहिवाशांनी आधी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा मग पाडकाम करा अशी भूमिका घेत आंदोलन केलं होतं.
प्रभादेवी आणि परळ परिसराला जोडणारा एल्फिन्स्टन पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. पूर्व पश्चिम जाण्यासाठी पादचारी पुलाचे काम आधी पूर्ण करा मगच हा पूल पूर्णत: बंद करा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली गेली. त्यानंतर स्थानिकांनी जोरदार घोषणाबाजी करत काम बंद पाडत 'पूल बंद'चा फलक आंदोलकांनी काढून टाकला होता. त्यानंतर आता वाहतूक पोलिसांकडून गणेशोत्सवानंतर पुलाचं पाडकाम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आल्यानं पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांकडून एल्फिन्स्टन पूल बंद झाल्यानंतर परिसरातील वाहतुकीत करावे लागणारे बदल यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. पूल बंद झाल्यानंतर वाहतूककोंडीचा प्रश्न उद्भवू शकतो यादृष्टिकोनातून वाहतूक विभागाकडून उपाययोजना केल्या आहेत. यासंदर्भात वाहतूक विभागाकडून लवकरच पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाणार आहे.