म्हाडा लॉटरीतील विजेत्यांची पात्रता निश्चिती रखडली
By Admin | Updated: July 8, 2015 02:01 IST2015-07-08T02:01:23+5:302015-07-08T02:01:23+5:30
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळिंज येथील घरांची लॉटरी आगामी जानेवारी महिन्यात काढण्याची घोषणा म्हाडाने केली आहे.

म्हाडा लॉटरीतील विजेत्यांची पात्रता निश्चिती रखडली
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळिंज येथील घरांची लॉटरी आगामी जानेवारी महिन्यात काढण्याची घोषणा म्हाडाने केली आहे. मात्र गतवर्षी जूनमध्ये काढण्यात आलेल्या लॉटरीतील विजेत्यांची पात्रतानिश्चिती अद्याप झालेली नाही. लॉटरीच्या एक वर्षानंतरही पात्रता निश्चितीची प्रक्रिया सुरू न झाल्याने विजेत्यांकडून म्हाडाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
जून २0१५मध्ये म्हाडाने विरार-बोळिंज येथील एक हजार ७१६ घरांची लॉटरी काढली. यामध्ये यशस्वी झालेल्या विजेत्यांकडून अद्याप कोकण मंडळाने पात्रता निश्चितीसाठी कागदपत्रे मागवलेली नाहीत. लॉटरी लागून वर्ष उलटले तरी अद्याप विजेते म्हाडाच्या पत्राची आतूरतेने वाट पाहात आहेत. गेल्या वर्षीच्या लॉटरीतील विजेत्यांची पात्रता निश्चितीची कोणतीही प्रक्रिया सुरू नसताना म्हाडाने पुन्हा एकदा येथील सुमारे अडीच हजार घरांची लॉटरी जानेवारी २0१६ मध्ये काढण्याची घोषणा केली आहे. विरार-बोळिंज येथील ५0 इमारतींचे बांधकाम सुरू असून, ते मार्च २0१६ पर्यंत पूर्ण होईल. तसेच जानेवारीच्या लॉटरीपूर्वी गतवर्षीच्या लॉटरीतील विजेत्यांची पात्रता निश्चिती पूर्ण केली जाईल, असे कोकण मंडळाचे मुख्याधिकारी विजय लहाने यांनी सांगितले.
----------
घराची किंमत ५0 हजारांनी कमी होणार
विरार-बोळिंज येथील गत वर्षी काढण्यात आलेल्या लॉटरीतील अल्प उत्पन्न गटातील घराच्या किमतीमध्ये ५0 हजार रुपयांनी कपात करण्याचा निर्णय कोकण मंडळाने घेतला असल्याचेही कोकण मंडळाचे मुख्याधिकारी विजय लहाने यांनी सांगितले. जून २0१४ मध्ये काढण्यात आलेल्या लॉटरीत अल्प उत्पन्न गटातील घराची किंमत २५ लाख १९ हजार ९0९ इतकी होती. तर मध्यम उत्पन्न गटातील घरांची किंमत ५0 लाख २१ हजार ५१४ होती.