Join us

माहुलवासीयांचा आझाद मैदानात एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 06:01 IST

३० हजार लोक त्रस्त : तरीही राज्यभर सीएम चषक सुरू असल्याचा आरोप

मुंबई : मागील ४८ दिवसांपासून विद्याविहार येथील आंबेडकर नगरमध्ये माहुलवासीयांचे ‘जीवन बचाव’ आंदोलन सुरू होते. सरकारकडून माहुलवासीयांच्या मागण्या मान्य न झाल्याने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी आझाद मैदानात माहुलवासीयांनी आंदोलन केले.

शनिवारी सकाळी ११ वाजता मशीद स्थानकाजवळील कर्नाक बंदर येथून मंत्रालयाच्या दिशेने मोर्चा निघाला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना मंत्रालयात जाण्यापासून मज्जाव केल्याने मोर्चा आझाद मैदानात वळविण्यात आला. आंदोलनामध्ये कुर्ला, वांद्रे, साकीनाका, विद्याविहार, अंबुजवाडी, मांडला, अंधेरी आणि वेगवेगळ्या ठिकाणी विस्थापित करण्यात आलेले हजारो आंदोलनकर्ते या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले होते. ‘एकीकडे राज्यभर सीएम चषक चालू आहे, दुसरीकडे माहुलमध्ये ३० हजार लोक असह्य यातना सहन करत आहेत’, ‘शासनाचे प्राधान्य कशाला आहे?’, ‘लढेंगे और जीतेंग’, ‘माहुल में घर के नाम पर, स्मशान घाट भेजा’, ‘संघर्ष हमारा नारा है’ अशा घोषणा देत हातात पोस्टर, बॅनर घेऊन आझाद मैदानात आंदोलन सुरू होते.माहुल प्रकल्पग्रस्तांना शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही रहिवाशांचा मृत्यू ओढावला आहे. प्रकल्पग्रस्तांना सुरक्षितस्थळी घर मिळण्याची मागणी आंदोलकांनी केली. मागण्या पूर्ण होत नाहीत, मुख्यमंत्री आंदोलकांची भेट घेत नाही, तोपर्यंत आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.मुंबई शहर आणि उपनगरातील प्रकल्पबाधित नागरिकांना माहुल येथे स्थलांतरित करण्यात आले. हा परिसर प्रदूषित असल्याने राहण्यायोग्य नाही. त्यामुळे दुसरीकडे स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे. सरकारचे माहुलवासीयांकडे दुर्लक्ष होत आहे. रहिवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे माहुलवासीयांचे स्थलांतर करण्याची मागणी जोर धरत आहे. ही मागणी मान्य होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़घटनेनुसार जगण्याचा अधिकारज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर म्हणाल्या की, आंदोलनकर्ते आपला जगण्याचा अधिकार मागत आहेत. राज्यघटनेने सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. हा अधिकार अंमलात येण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. माहुल येथील वातावरण मानवी आरोग्यासाठी घातक आहे. परिणामी, त्याचे स्थलांतरण होणे आवश्यक आहे. म्हाडाने ३५० घरे देण्याची तयारी दाखविली. यावर मुख्यमंत्र्यांचे शिक्कामोर्तब झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी भेट द्यावी, यासाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू राहणार आहे.२८ आॅक्टोबरपासून विद्याविहार येथील आंबेडकर नगर २ येथे ‘जीवन बचाव आंदोलन’ सुरू आहे. २ वर्षांत ५०० पेक्षा जास्त नागरिक आजारी झाले आहेत. १५ पेक्षा जास्त उद्योगांच्या माध्यमातून रसायने पाण्यात आणि हवेत मिसळत आहेत. माहुलवासीयांना आजार, त्वचा रोग, फुप्फुसाच्या आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि सुरक्षित जीवन मिळावे, अशी माहुलवासीयांची इच्छा आहे. माहुल परिसर राहण्यायोग्य नसतानाही महापालिका व सरकारी प्रशासनांकडून मुंबईतील विविध भागातील प्रकल्पग्रस्तांना माहुलसारख्या प्रदूषित भागात स्थलांतरित करण्यात आले.

टॅग्स :मुंबईलोकल