अकरावीच्या ऑनलाइन वर्गांना पुन्हा सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:09 IST2020-12-05T04:09:18+5:302020-12-05T04:09:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी एससीईआरटीकडून या विद्यार्थ्यांच्या ...

अकरावीच्या ऑनलाइन वर्गांना पुन्हा सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी एससीईआरटीकडून या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन वर्गांना सुरुवात करण्यात आली होती. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मध्यंतरीच्या काळात या तासिकांना ब्रेक लागला होता. मात्र ३ डिसेंबरपासून वाणिज्य, कला व विज्ञान या तिन्ही शाखांचे ऑनलाइन वर्ग पुन्हा सुरू झाले आहेत.
२ नोव्हेंबर २०२० पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), महाराष्ट्र, पुणे यांच्या यूट्युब चॅनेलच्या माध्यमातून तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन सकाळी ८.४० ते १०.४० या वेळेत उपलब्ध करून देण्यात आले आहे. ११ नोव्हेंबर २०२० पासून दिवाळीची सुट्टी तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांच्या इतर शालेय कामकाजामुळे २ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाइन वर्ग बंद हाेते. मात्र आता ३ डिसेंबरपासून तिन्ही शाखांसाठी ते सुरू करण्यात आले असून, सर्व दैनिक तासिकांचे तपशीलवार वेळापत्रक परिषदेच्या https://covid19.scertmaha.ac.in/eleventh या लिंकवर उपलब्ध असल्याची माहिती उपसंचालक विकास गरड यांनी दिली.