Join us  

अकरावी प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाच्या कचाट्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 2:47 AM

Admission News : ९ सप्टेंबर रोजी दुसऱ्या गुणवत्ता यादीला स्थगिती मिळाल्यानंतर अकरावी  प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याला प्रवेश कधी मिळणार? प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार? या प्रश्नांची उत्तरे  सापडली नसल्याने ते तणावात आहेत.

मुंबई : मागील दोन महिन्यांपासून मराठा आरक्षणाला मिळालेल्या  स्थगितीमुळे थांबवलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया आता पुन्हा महिनाभर लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी, २७ ऑक्टोबरला मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर काहीतरी निर्णय होईल आणि प्रक्रिया पुन्हा सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र ९ सप्टेंबर रोजी दुसऱ्या गुणवत्ता यादीला स्थगिती मिळाल्यानंतर अकरावी  प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याला प्रवेश कधी मिळणार? प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार? या प्रश्नांची उत्तरे  सापडली नसल्याने ते तणावात आहेत.कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे इयत्ता दहावीचा निकाल नेहमीपेक्षा उशिराने जाहीर झाला आणि त्यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. अकरावी प्रवेशामध्ये एकूण जागांच्या १२ टक्के जागांवर मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. मात्र मराठा (एसईबीसी) आरक्षणाला सर्वोच्च न्‍यायालयातून मिळालेल्‍या स्‍थगितीनंतर दुसऱ्या फेरीपासून पुढील प्रक्रिया स्‍थगित केली होती. तब्‍बल ४७ दिवस उलटून गेलेले असताना अद्यापपर्यंत ही प्रक्रिया सुरळीत झालेली नाही.  विद्यार्थ्यांच्‍या करिअरच्‍या दृष्टीने बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम अत्‍यंत महत्त्वाचा समजला जातो. विज्ञान शाखेत तर इयत्ता अकरावी आणि बारावीच्‍या शिक्षणक्रमावर आधारित विविध पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश प्रक्रियांचा अभ्यासक्रम असतो, असे असताना प्रक्रिया रखडल्‍याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.  

महाविद्यालयांपुढे पेचसामान्‍यतः प्रवेशाच्‍या वेळापत्रकासोबत अध्ययन सुरू करण्याच्‍या तारखेची घोषणा केली जाते, किंवा महाविद्यालयात उपलब्‍ध जागांपैकी बहुतांश जागा भरल्‍यावर अध्ययन प्रक्रिया सुरू करण्याच्‍या सूचना शिक्षण विभाग देत असते. परंतु अकरावी प्रवेशाची पहिली फेरी झालेली असताना, त्‍यात फारसे प्रवेश झालेले नाहीत. या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम सुरू करायचा की नाही, असा पेच महाविद्यालयांपुढे उभा राहिला आहे. अभ्यासक्रम सुरू केल्‍यास, नंतर प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुन्‍हा नव्‍याने वर्ग घ्यावा लागण्याची वेळ येणार असल्याने महाविद्यालयांपुढील आव्‍हान वाढले आहे. दुसरीकडे अध्ययन प्रक्रियेला विलंब झाल्‍याने मर्यादित वेळेत शिक्षणक्रम पूर्ण करणे कठीण होणार असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे.एसईबीसीअंतर्गत १७ हजार ८४४ जागाअकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत मुंबई विभागात ७८ हजार ६१० विद्यार्थ्यांनी तर राज्यात १ लाख १६ हजार ५८९ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. मुंबई विभागात एसईबीसीअंतर्गत अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी १७ हजार ८४४ जागा उपलब्ध आहेत. मात्र पहिल्या फेरीसाठी केवळ २ ९२३ विद्यार्थ्यांनीच या जागांसाठी अर्ज सादर केले होते. त्यापैकी २,७८८ जागांवर विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश देण्यात आले होते. 

टॅग्स :शिक्षणशिक्षण क्षेत्र