‘एलिफंटा’ची बत्ती गुल
By Admin | Updated: May 8, 2015 22:42 IST2015-05-08T22:42:00+5:302015-05-08T22:42:00+5:30
एलिफंटा बेटासाठी वीजपुरवठा करण्याकामी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच दिले होते.

‘एलिफंटा’ची बत्ती गुल
उरण : एलिफंटा बेटासाठी वीजपुरवठा करण्याकामी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच दिले होते. मात्र एलिफंटा बेटावर सध्या तात्पुरत्या स्वरूपात चार तासांसाठी सुरू असलेला विद्युतपुरवठाही डिझेलअभावी गुरुवारपासून बंद झाला आहे. बेटावरील बत्ती गुल झाल्याने एलिफंटा बेट अंधारात बुडाले आहे. यामुळे बेटवासीयांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
एलिफंटा बेटावर कायमस्वरूपी वीजपुरवठा करण्याबाबत ग्रामपंचायतीने १४ वर्षांत एकही मागणीचे पत्र अथवा ठराव केलेला नाही. तरीसुध्दा शासनाच्या विविध विभागांकडून बेटाला कायमस्वरुपी वीजपुरवठा करण्याच्या योजना आखल्या जात आहेत. आजतागायत विविध राजकीय पक्षांच्या नऊ आजी - माजी मुख्यमंत्री, मंत्र्यांनीही बेटाला कायमस्वरुपी वीजपुरवठा करण्याची घोषणा केली आहे. मात्र अद्याप एकालाही ते शक्य झालेले नाही.
एलिफंटा बेटावरील तीनपैकी राजबंदर, शेतबंदर या दोन गावांना शासन आणि एमटीडीसींच्या माध्यमातून विद्युत जनित्रामार्फत संध्याकाळी फक्त साडेतीन तास वीजपुरवठा १९८९ पासून केला जात आहे. दरवर्षी डिझेलवर सुमारे २० ते २५ लाख खर्च होत आहे. विद्युत जनित्रासाठी लागणाऱ्या डिझेल पुरवठ्याचा ठेका महेश ट्रॅव्हल्स अॅण्ड टूर्स कंपनीला देण्यात आला आहे. मात्र शासनाकडे बिले थकीत आहेत, असे सांगत कंपनीने मनमानी करीत गुरुवारपासून अचानक डिझेल पुरवठा करणे बंद केला असल्याची माहिती एमटीडीसीचे तंत्रज्ञ प्रभाकर शिंदे यांनी दिली.
ठेकेदाराला विनंती करुनही डिझेल पुरवठा करण्यास इन्कार केल्याने गुरुवारपासून एलिफंटा बेटाला वीजपुरवठा करणारी विद्युत जनित्र बंद पडली आहेत. वीजपुरवठा कधी सुरु होईल हे सांगता येत नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, एलिफंटा बेटाच्या विद्युत जनित्रापासून वीजपुरवठ्यावर शासनाच्या मध्यस्थीने डिझेल पुरवठा आणि देखभालीवर ४० लाख रुपये खर्च होत आहेत. (वार्ताहर)