फुणगूसची धर्मशाळा मोजतेय घटका
By Admin | Updated: August 11, 2014 00:12 IST2014-08-10T22:55:37+5:302014-08-11T00:12:51+5:30
गलबतामधील कामगारांना विश्रांतीसाठी फुणगूस बंदरालगत एक धर्मशाळा उभारण्यात आली होती

फुणगूसची धर्मशाळा मोजतेय घटका
फुणगूस : ब्रिटिश काळात फुणगूस, कुरधुंडा व संगमेश्वर ही तिन्ही बंदरे मोठी झाली. मोठमोठी गलबते, जहाज फुणगूस बंदरावर येऊन थांबायची. गलबतामध्ये जीवनावश्यक वस्तू, सिमेंटची पोती, कौले, धान्य अशांनी गलबत खच्चून भरलेले असायचे. गलबतामधील कामगारांना विश्रांतीसाठी फुणगूस बंदरालगत एक धर्मशाळा उभारण्यात आली होती. दुर्लक्षामुळे ही धर्मशाळा आता अखेरची घटका मोजत आहे.
आजही फुणगूस बंदरालगत ‘धर्मशाळा’ उभी आहे. परंतु कोणत्या स्थितीत? तिथे सध्या राहतो कोण? असे प्रश्न ओघाने आलेच. या प्रश्नांच्या उत्तरांसाठी आपल्याला फुणगूस येथे यावे लागेल किंवा जयगड बंदर विभागातील अधिकाऱ्यांना विचारावे लागेल. या इमारतीवर ताबा बंदर विभागाचा आहे.
प्रत्यक्षात बंदर विभागातील जयगड कार्यालयातील अधिकाऱ्यांनादेखील याची उत्तरे कदाचित माहीत नसावीत. या इमारतींकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. अशा इमारतींवर व तेथील जागेवर हक्क त्यांचा असला तरी जबाबदाऱ्या त्यांच्या नाहीत. धर्मशाळेची इमारत सध्या शेवटची घटका मोजत आहे. कधी कोणत्याही क्षणी ही इमारत जमीनदोस्त होऊ शकते. छप्पर पूर्णपणे सडून गेले आहे. भिंती तर नाहीच नाहीत. आजूबाजुला घनदाट जंगल, रात्री सोडाच दिवसादेखील येथे कोणी जात नाही. ही इमारत बाजारपेठेत आहे. या धर्मशाळेत वहिवाट आहे ती कुत्रे, मांजर, मोठमोठे सर्प, घुशी यांची!
अनेकवेळा जयगड बंदर विभागाला याची कल्पना देण्यात आली आहे. त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. कोणलाही त्याची काळजी नाही. इमारत पडली, जमीनदोस्त झाली तरी चालेल. पण, इमारत पडली तर फारच नुकसान होईल. ते बंदर विभागाचे नव्हे; तर आजूबाजूच्या इमारतींचे अशी सध्याची अवस्था आहे. धर्मशाळा इमारतीच्या एका बाजूला ग्रामपंचायत सदस्य पप्पू सुर्वे यांचे घर, तर दुसऱ्या बाजूला बेर्डे यांचे दुकान व राहते घर आहे. समोरच डॉ. खातू यांचा दवाखाना व घर आहे. यामुळे ही इमारत पडली तर यापैकी कोणाला तरी एकाला किंमत चुकवावी लागणार आहे. (वार्ताहर)