इलेक्ट्रॉनिक्स खेळणी दुरुस्तीस
By Admin | Updated: January 26, 2015 00:51 IST2015-01-26T00:51:14+5:302015-01-26T00:51:14+5:30
पालिकेने बच्चेकंपनीसाठी शहरातील साई उद्यानात प्रथमच बसविलेल्या इलेक्ट्रॉनिक्स खेळणी गेल्या दीड वर्षापासून नादुरुस्त होत्या

इलेक्ट्रॉनिक्स खेळणी दुरुस्तीस
राजू काळे, भार्इंदर
पालिकेने बच्चेकंपनीसाठी शहरातील साई उद्यानात प्रथमच बसविलेल्या इलेक्ट्रॉनिक्स खेळणी गेल्या दीड वर्षापासून नादुरुस्त होत्या. त्याकडे आजी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने दुर्लक्ष केल्यानंतर माजी नगरसेवक ओमप्रकाश गाडोदिया यांनी मात्र पालिकेकडे सतत पाठपुरावा केल्यानंतर प्रभारी आयुक्त भरत शितोळे यांनी ती खेळणी त्वरित दुरुस्तीसाठी रवाना केलीत.
प्रभाग क्र. १८ अंतर्गत साईबाबा उद्यानात माजी नगरसेवक ओमप्रकाश गाडोदिया यांच्या नगरसेवक निधीतून पालिकेने बच्चेकंपनीसाठी प्रथमच इलेक्ट्रॉनिक्स खेळणी आॅक्टोबर २०११ मध्ये बसविल्या होत्या. शहरात या एकमेव खेळण्या मोफत उपलब्ध असल्याने बच्चेकंपनीची या उद्यानात नेहमी मोठी गर्दी असते. गर्दीचे नियोजन करण्यासाठी मुलांना रांगेने केवळ २ ते ३ मिनिटांसाठी या खेळाचा आनंद घेता येत असल्याने अशा खेळण्या इतर उद्यानांतही बसविण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. परंतु, या खेळण्यांच्या २ वर्षांच्या देखभाल दुरुस्तीसाठी त्या बनविणाऱ्या कंपनीलाच नियुक्त करण्यात आले असतनाही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने त्या गेल्या दीड वर्षापासून बंद होत्या. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीने योग्य पाठपुरावा न केल्याने प्रशासनानेही त्यांच्या दुरुस्तीसाठी ठोस पावले उचलली नाहीत. यामुळे या उद्यानात खेळण्यासाठी येणाऱ्या बच्चेकंपनीला पर्यायी खेळणी खेळून इलेक्ट्रॉनिक्स खेळण्यांपासून वंचित राहावे लागत होते. दरम्यान, प्रशासनाने या खेळण्यांच्या दुरुस्तीसाठी ५० हजार रु.ची तजवीज केली होती. तीही योग्य प्रतिसादाअभावी रखडल्याने खेळण्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत दिवस कंठीत होत्या. अखेर, गाडोदिया यांच्या प्रयत्नांना यश आले.