सीमाशुल्क कपातीचा इलेक्ट्रॉनिक्सला फारसा फायदा नाही
By Admin | Updated: March 5, 2015 23:01 IST2015-03-05T23:01:25+5:302015-03-05T23:01:25+5:30
केंद्रीय अर्थसंकल्पात काही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या सुट्या भागांवरील सीमाशुल्कात कपात करण्यात आल्याने स्थानिक उत्पादकांना फारसा दिलासा मिळणार नाही;

सीमाशुल्क कपातीचा इलेक्ट्रॉनिक्सला फारसा फायदा नाही
निर्णयाचे स्वागत : परिणाम दिसायला वेळ लागेल; काही उत्पादनांच्या खर्चात होईल कपात
मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पात काही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या सुट्या भागांवरील सीमाशुल्कात कपात करण्यात आल्याने स्थानिक उत्पादकांना फारसा दिलासा मिळणार नाही; मात्र असे असले तरी देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार करीत असलेल्या उपाययोजनांतील हे पहिले पाऊल असल्याने ते उल्लेखनीय ठरणार आहे.
मायक्रोवेव्ह ओव्हन, रेफ्रिजरेटर, एलईडी यांसारख्या उत्पादनांसाठी आवश्यक काही सुट्या भागांच्या सीमाशुल्कात कपात करण्यात आली आहे. यामुळे या उत्पादनांच्या जोडणीतील खर्चात कपात होईल, असा अंदाज आहे.
यासंदर्भात गोदरेज अप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी यांनी मात्र याचा परिणाम दिसायला आणखी काही दिवस जावे लागतील, असे सांगितले.
सीमाशुल्कात कपात केल्याने १ किलोवॅटपर्यंतच्या मॅग्नेट्रॉन्सच्या किमतीत फक्त ५0 ते ६0 रुपये फरक पडेल. त्यामुळे उत्पादन वाढीवर याचा फारसा सकारात्मक परिणाम लगेचच होणे शक्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मायक्रोवेव्ह ओव्हनच्या एकूण विक्रीतील ७0 टक्के हे आयात केलेले असतात. बहुतांश आयात ही चीनमधून होत असून, त्या देशात मुळातच ओव्हन स्वस्त आहेत. त्याशिवाय आपल्याकडील करप्रणालीमुळे आयात केलेले ओव्हन देशांतर्गत उत्पादित ओव्हनपेक्षा १५ ते २0 टक्के स्वस्त आहेत, असेही उत्पादकांचे म्हणणे आहे.
काही रेफ्रिजरेटर उत्पादकांनीही सीमाशुल्क कपातीच्या परिणामांचा अभ्यास करावा लागेल, असे म्हटले आहे. मार्च आणि एप्रिलसाठी आम्ही कॉम्प्रेसरची आयात केली आहे. त्यामुळे लगेच आम्हाला फायदा मिळणार नाही. दीर्घकालीन विचार करता आम्हाला अनेक गोष्टी पाहाव्या लागतील, असे हेअर कंपनीच्या भारतीय विभागाचे अध्यक्ष एरिक ब्रॅगान्झा यांनी म्हटले आहे.
व्हिडिओकॉनचे संचालक अनिरुद्ध धूत यांनी सांगितले की, सर्वसाधारणपणे महागड्या वस्तू आयात केल्या जातात. ओएलईडी डिस्प्ले पॅनेलच्या सीमाशुल्कात कपात केल्याने अनेक कंपन्या आता या महाग टी.व्ही. संचांची जोडणी देशात करण्याबाबत विचार करतील. त्यामुळे कि मती काही प्रमाणात खाली येतील.
(प्रतिनिधी)