Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर वेगाने सुटत आहेत वीजग्राहकांच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 01:53 IST

- सचिन लुंगसे मुंबई : वीजग्राहकांच्या समस्या विजेच्या वेगाने सोडविल्या जात असल्याचा दावा महावितरण, अदानी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर आणि ...

- सचिन लुंगसे मुंबई : वीजग्राहकांच्या समस्या विजेच्या वेगाने सोडविल्या जात असल्याचा दावा महावितरण, अदानी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर आणि बेस्ट इलेक्ट्रिसिटी या चारही वीज कंपन्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, तंत्रज्ञानाच्या युगात वीजग्राहकांच्या समस्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी चारही वीज कंपन्यांकडून टिष्ट्वटर, फेसबुक, अ‍ॅप, कॉल सेंटरसह मेसेजचा वापर केला जात असून, यात अधिकाधिक आधुनिकता कशी आणता येईल? यावर भर दिला जात असल्याचे वीज कंपन्यांकडून सांगण्यात आले.वीजग्राहकांच्या शंकांचे समाधान करण्यासह समस्या सोडविण्यासाठी महावितरणचे दोन टिष्ट्वटर हँडल आहेत. या व्यतिरिक्त फेसबुक अकाउंट आहे. याव्यतिरिक्त चार अ‍ॅप आहेत. महावितरणच्या टिष्ट्वटर हँडलच्या माध्यमातून दाखल झालेली तक्रार संबंधित व्यक्ती अथवा विभागाकडे पाठविली जाते. तक्रार कोणत्या स्वरूपाची आहे, किती मोठी आहे? याचे गांभीर्य ओळखत ती सोडविण्यावर भर दिला जातो. तक्रार सोडविल्यानंतर तिचा मागोवाही (फिडबॅक) घेतला जातो. विशेषत: ग्राहकांना वीजबाबतची माहिती वेळेत मिळावी, योजनांची माहिती मिळावी; प्रत्येक वीज ग्राहकांपर्यंत पोहोचता यावे, याकरिता महावितरणचे कॉलसेंटरदेखील आहेत. या माध्यमातून प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली जातात. त्यासाठी राज्यात विभागनिहाय यंत्रणा कार्यान्वित असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक समस्या सोडविण्यावर भर दिला जातो.मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात वीजपुरवठा करत असलेल्या अदानी इलेक्ट्रिसिटी ही वीज कंपनी सोशल मीडियाचा उत्तम वापर करत आहे. टिष्ट्वटर, फेसबुक, एसएमएस, संकेतस्थळ, कॉल सेंटरसह प्रत्येक माध्यमातून वीजग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यावर कंपनीचा भर आहे. विशेषत: एसएमएसबाबत कंपनी अगदी वेगाने कार्यरत असून, एखाद्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होणार असेल, तर त्याची माहिती आगाऊ ग्राहकांना दिली जात असून, अधिकाधिक डिजिटल सेवा वापरण्यावर वीजग्राहकांनी भर द्यावा, असे आवाहन अदानीकडूनच केले जात आहे. अदानीची ही यंत्रणा २४ तास कार्यान्वित असते. प्रत्येक संवादाचा पाठपुरावा ठेवण्यासह कृती करण्यावरही भर दिला जातो. सोशल मीडियावर दाखल झालेली तक्रार सोडविली गेली की नाही, याचा पाठपुरावा वरिष्ठांकडूनही घेतला जातो. कस्टमर केअर सेंटर, कॉल सेंटर, ईमेल, दररोजचे अहवाल; या गोष्टी वरिष्ठ पातळीवर तपासल्या जातात. सोशल मीडियावर ग्राहकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, सेवेबाबत ग्राहक समाधानी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सोशल मीडियाचा उपयोग कमीतकमी वेळेत समस्या सोडविण्यासाठी केला जात असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. बेस्ट इलेक्ट्रिसिटी टिष्ट्वटरच्या माध्यमातून ऊर्जा बचतीबाबत अग्रेसर असतानाच, वीजग्राहकांसाठीच्या विविध योजनांची माहिती याद्वारे पुरविली जात आहे. मार्गप्रकाश दिवे बंद, मार्गप्रकाश स्तंभाला आग लागणे, शॉक लागणे, स्विच बॉक्सचे उघडे झाकण यांसारख्या तक्रारींसाठी महापालिकेच्या एफ दक्षिण, एफ उत्तर, जी दक्षिण आणि जी उत्तर वॉर्डकरिता बेस्ट उपक्रमाकडून व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात येतात. वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्याबाबत कॉल सेंटरवरच भर दिला जात आहे.

टॅग्स :सोशल मीडिया