Join us

खुल्या बाजारातून वीज, म.रे.ची ६ हजार कोटींची बचत; मोठा आर्थिक फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 12:19 IST

भारतीय रेल्वेने वीज खरेदीत बचत करण्याचे धोरण अवलंबले आहे. या धोरणाचा मध्य रेल्वेने सर्वांत प्रथम अवलंब केला असून, त्याचा मोठा आर्थिक फायदा प्रशासनाला झाला आहे.

मुंबई :  मध्य रेल्वेने ‘ओपन ॲक्सेस’ प्रणालीचा अर्थात खुल्या बाजारात वीज खरेदीचा निर्णय घेतल्याने २०१५ पासून सहा हजार ६,००५.४२ कोटी रुपयांची बचत केली आहे.

 भारतीय रेल्वेने वीज खरेदीत बचत करण्याचे धोरण अवलंबले आहे. या धोरणाचा मध्य रेल्वेने सर्वांत प्रथम अवलंब केला असून, त्याचा मोठा आर्थिक फायदा प्रशासनाला झाला आहे.

भारतीय रेल्वे पूर्वीच्या काळात प्रत्येक राज्यांतील राज्य वीज महामंडळे किंवा राज्य वीज वितरण कंपन्यांकडून वीज खरेदी करत होती. राज्याचा विचार करता या विजेचा दर ९ प्रतियुनिट होता, त्यामुळे रेल्वेच्या एकूण खर्चात मोठी वाढ झाली होती. मात्र, २०१५ मध्ये भारतीय रेल्वेने ‘ओपन ॲक्सेस’मधून वीज खरेदीचा मोठा निर्णय घेतला.

परिणामी इतर वीज निर्मिती कंपन्याकडून किंवा बाजारातून स्वस्त दरांत वीज खरेदी करण्याची संधी मिळाली असून, त्याचा थेट फायदा मध्य रेल्वेला झाला.

मध्य रेल्वेने २०१५ पासून ‘ओपन ॲक्सेस’मार्फत वीज खरेदी सुरू केली. त्यामुळे आता मध्य रेल्वेला १० वर्षांत रेल्वेच्या वीज खर्चात ६,००५.४२ कोटी रुपयांची बचत झाली. ‘ओपन ॲक्सेस’मुळे वीज खरेदीचा दर

९ रुपये वरून ५.५० ते  ६.५० रुपये इतका कमी झाला. याचा थेट परिणाम रेल्वेच्या वीज बिलावर झाला.

फायदा असा...

स्वस्त वीज खरेदीसाठी

अनेक पर्याय उपलब्ध.

वीज खरेदीसाठी बाजारातील स्पर्धात्मक दरांचा लाभ.

सौर आणि पवनऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून नवीनतम ऊर्जा स्रोतांचा वापर करणे शक्य.

१० वर्षांपासून अवलंब

२०१५-१६ मध्ये रेल्वेने ७९४ दशलक्ष युनिट ऊर्जा वापरून १६१ कोटींची बचत केली. २०१८-१९ मध्ये ही बचत ७१६ कोटी इतकी झाली, तर २०२३-२४ मध्ये ती वाढून ७५२ कोटींवर पोहोचली. आजपर्यंतची एकूण बचत ६,००५.४२ कोटी एवढी झाली आहे.

वीज वापर आणि झालेली बचत

               विजेचा वापर   बचत

       वर्ष    (मिलियन      (कोटी रु.)

               युनिट्स)

२०१५-१६       ४९७    १६१.२०

२०१६-१७       १८३६   ७०७.७३

२०१७-१८       १९४०   ६२३.५६

२०१८-१९       २०७६   ७१६.१९

२०१९-२०       २११३   ६६०.५८

२०२०-२१       १४५३   ४००.३२

२०२१-२२       २१०६   ६१९-८७

२०२२-२३       २५६०   ६७३.१०

२०२३-२४       २८४३   ६५२.४०