वीज कंपन्यांत मोबाइल वॉर!

By Admin | Updated: August 15, 2014 02:48 IST2014-08-15T02:48:41+5:302014-08-15T02:48:41+5:30

वीज ग्राहक कमी वीजदरासाठी इकडून तिकडे उड्या मारत असतानाच वीज ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वीज कंपन्यांकडून विविध खेळी खेळल्या जात आहेत

Electricity companies mobile war! | वीज कंपन्यांत मोबाइल वॉर!

वीज कंपन्यांत मोबाइल वॉर!



मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील वीज ग्राहक कमी वीजदरासाठी इकडून तिकडे उड्या मारत असतानाच वीज ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वीज कंपन्यांकडून विविध खेळी खेळल्या जात आहेत. मुंबई शहरात वीजपुरवठा करणाऱ्या बेस्ट उपक्रमाने टाटाला टक्कर देण्यासाठी सर्वस्व पणाला लावले असून, ग्राहकांना वीज बिलाची माहिती एसएमएसद्वारे मोबाइलवर देण्यास एक पाऊल पुढे टाकले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात एकूण चार वीज कंपन्या वीजपुरवठा करत आहेत. बेस्ट उपक्रमातर्फे मुंबई शहरात वीजपुरवठा केला जातो आहे. तर टाटा, रिलायन्स आणि महावितरण या उर्वरित तीन कंपन्यांतर्फे पूर्व व पश्चिम उपनगरात वीजपुरवठा केला जातो आहे. पूर्व उपनगरातील भांडुप आणि मुलुंड या दोन ठिकाणांना महावितरणतर्फे वीजपुरवठा केला जात असून, टाटा आणि रिलायन्स या दोन कंपन्यांत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धा रंगली आहे.
मुळात रिलायन्सपेक्षा टाटाचे वीज दर कमी असल्याने अधिकाधिक ग्राहक टाटाकडे वर्ग होत आहेत. त्यातच मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने टाटा पॉवरला शहरातही वीज वितरणासाठी हिरवा कंदील दिल्याने बेस्ट उपक्रमाचे धाबे दणाणले आहे. परंतु यावर बेस्टनेही आक्रमक खेळी खेळत टाटाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात वीज वितरणाचे जाळे नसल्याने टाटाला ग्राहकांपर्यंत पोहचण्यास अडचणी येत आहे. त्यातच उद्या म्हणजे १५ आॅगस्ट रोजी टाटा पॉवरचा वीज वितरणाचा परवानाही संपत आहे. परिणामी टाटाला वीज वितरणाचा परवाना राज्य वीज नियामक आयोगाकडून वाढवून मिळतो की नाही? याकडे वीज वीजतज्ज्ञांचेही लक्ष लागले आहे.
तर टाटाला परवाना वाढवून
मिळो अथवा नाही; तरीदेखील शहरातील वीज ग्राहकांना आकर्षित करण्यासह त्यांना उल्लेखनीय
सेवा देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने आणखी एक पाऊल पुढे टाकले
आहे. बेस्ट उपक्रमाच्या वतीने यापूर्वीच मोबाइलवरून वीज बिलाची
रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
परंतु आता यात आणखी भर घालण्यात आली आहे. बेस्टच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वीज बिलाची माहिती ग्राहकांना एसएमएसद्वारे मोबाइलवरून देण्यासाठी बेस्ट सरसावली आहे. अनेक वेळा ग्राहकांकडून विजेचे बिल भरण्यात येत नाही. परिणामी त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईपासून ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून बेस्टने ही योजना हाती घेतली आहे.
या योजनेंतर्गत वीज ग्राहकांना वीज बिलाच्या रकमेची माहिती एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. शिवाय वीज बिल भरण्याची अंतिम तारीखही ग्राहकांना एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर थकबाकी भरण्यासाठीची विनंतीदेखील एसएमएसद्वारे करण्यात येणार आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना प्रथमत: आपल्या मोबाइल क्रमांकाची नोंद बेस्टकडे करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Electricity companies mobile war!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.