Join us  

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर लवकरच सहा ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 4:26 AM

केंद्र सरकारने वाहन उत्पादन कंपन्यांना इलेक्ट्रिक कार बनविण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहनांची वर्दळ पाहता या मार्गावर लवकरच सहा ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि महावितरण संयुक्तपणे काम करणार आहेत.केंद्र सरकारने वाहन उत्पादन कंपन्यांना इलेक्ट्रिक कार बनविण्याचे आवाहन केले आहे. आता रस्त्यावर इलेक्ट्रिक वाहने धावू लागल्याने त्यांना लागणारे चार्जिंग पॉइंट उभारण्याची गरज भासू लागली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर एकूण सहा ठिकाणी चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.फूड मॉल्स तसेच संपूर्ण एक्स्प्रेस-वे या मार्गावर दोन्ही दिशेला तीन या प्रमाणे एकूण सहा ठिकाणी हे चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी सध्या दोन्ही विभागात पत्रव्यवहार झाला आहे. येत्या जानेवारीअखेर ही चार्जिंग स्टेशन तयार होतील, असा विश्वास दोन्ही व्यवस्थापनांकडून व्यक्त करण्यात आला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर सांजेगाव, उरसे या ठिकाणी तर परतीच्या पुणे-मुंबई मार्गावर हॉटेल पूजा व दाहोवाडी या ठिकाणी हे चार्जिंग स्टेशन असणार आहे.महावितरणने नॅशनल मोबिलिटी मिशनला सपोर्ट करण्यासाठी एकूण दीड कोटी रुपये गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे. महावितरणने राज्यात ५० चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १० चार्जिंग स्टेशनसाठी लेटर आॅफ इंटेन्ट देण्यात आले आहे. तर पुणे व नागपूर या २ ठिकाणी याआधीच प्रायोगिक तत्त्वावर चार्जिंग स्टेशन कार्यरत झाली आहेत.

टॅग्स :मुंबई-पुणे एक्सप्रेस वे