निवडणुकीचे धूमशान सुरू
By Admin | Updated: May 18, 2015 22:51 IST2015-05-18T22:51:41+5:302015-05-18T22:51:41+5:30
दोन दिवसापूर्वी जाहीर झाला. १४ जून रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी कमी अवधी मिळत असल्यामुळे प्रशासनासह राजकीय पक्षांचीही धावपळ सुरू झाली आहे.

निवडणुकीचे धूमशान सुरू
दीपक मोहिते ल्ल वसई
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम दोन दिवसापूर्वी जाहीर झाला. १४ जून रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी कमी अवधी मिळत असल्यामुळे प्रशासनासह राजकीय पक्षांचीही धावपळ सुरू झाली आहे.
सन २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने बहुमत प्राप्त केल्याने मागील पाच वर्षांपासून त्यांच्या हातात सत्ता आहे. या वर्षात हजारो कोटी विकासकामांवर खर्च करण्यात आला. महानगरपालिका क्षेत्रात झालेली विकासकामे व प्रलंबित विकासकामे लक्षात घेऊन केंद्र सरकार व राज्य सरकारने महानगरपालिकेला आर्थिक निधी देताना झुकते माप दिले.
सॅटेलाईट सिटी योजनेअंतर्गत महानगरपालिकेला सुमारे १ हजार कोटीचा निधी मंजूर केला. या आर्थिक निधीतून सध्या भूमीगत गटारांची कामे सुरू आहेत. अल्पावधीत महानगरपालिकेचा अर्थसंकल्पही अडीच हजार कोटींच्या घरात पोहोचला. यासर्व पार्श्वभूमीवर १४ जून रोजी दुसरी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणी कमी पडत असल्याने महानगरपालिका प्रशासनातर्फे अतिरीक्त पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पूर्वीच्या आघाडी सरकारने यासर्व विकासकामांना झुकते माप दिले होते. तर, नव्याने स्थापन झालेले युती सरकारही या भागातील विकासकामांना अग्रक्रम देत आहे.
लोकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेता भविष्यात पाण्याचा प्रश्न उग्र रूप धारण करेल, अशी शक्यता गृहीत धरून प्रशासनाने विविध स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. आज महानगरपालिका हद्दीतील लोकसंख्या सुमारे १० ते १२ लाखाच्या घरात आहे. भविष्यात ती २० लाखाच्या घरात जाईल, हे लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत.
ग्रामीण भागातील जनतेच्या पाण्याच्या प्रश्न सोडवण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महानगरपालिका हद्दीमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत असतात. उन्हाळ्यात उपलब्ध असलेल्या धरणातील पाण्याची पातळी खोलवर जात असल्यामुळे काही भागात दिवसआड पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची कमी उपलब्धता तसेच महावितरणचा सावळा गोंधळ यामुळे वितरण व्यवस्थेमध्ये अडथळे निर्माण होतात. याचा त्रास नागरिकांना होतो.
गेल्या ५ वर्षात महानगरपालिका प्रशासन व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा केली. परंतु वीजपुरवठा खंडित होणे व भारनियमन करणे या दोन बाबींबाबत कोणतीही ठोस उपाययोजना होऊ शकली नाही. यासर्व पार्श्वभूमीवर होणाऱ्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्ष आजवर केलेल्या विकासकामांवर मतदारांकडे मतांचा जोगवा मागेल तर, दुसरीकडे प्रलंबित विकासकामांवर बोट ठेवत विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करेल.
एकंदरीत ही निवडणूक विकासकामांवरच लढली जाईल, असा अंदाज आहे. लोकसभेत पराभव झाल्यानंतरही विधानसभेच्या तीन जागा तसेच जिल्हापरिषद, पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन करणाऱ्या बहुजन विकास आघाडीला विरोधक कसे रोखतात यावर सर्वच राजकीय पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे.
महानगरपालिकेच्या पहिल्या अडीच वर्षासाठी बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक राजीव पाटील यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली. त्यानंतरच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत महापौर पदांचा कारभार नारायण मानकर यांच्याकडे सोपवण्यात आला. या दोन भागात सत्ताधारी पक्षाने प्रलंबित विकासकामे मार्गी लावलीच परंतु भूमीगत गटारे, अतिरीक्त धरण, रस्ता रूंदीकरण आदी विकासकामांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले व अल्पावधीतच हा संपूर्ण परिसर विकासाच्या वाटेवर मार्गस्थ झाला.
सन २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत ७ राष्ट्रीय स्तरावरील पक्ष रिंगणात उतरले होते. परंतु या सर्वांना चारीमुंड्या चित करून बहुजन विकास आघाडीने ८९ जागांपैकी ६३ जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व राखले. त्या निवडणुकीत एकुण ६ लाख ४७ हजार ४९१ मतदारांपैकी २ लाख ७० हजार ७५८ मतदारांनी आपला हक्क बजावला. एकूण ४१.८२ टक्के मतदान झाले. त्यापैकी बहुजन विकास आघाडीच्या विजयी उमेदवाराला १ लाख ३५ हजार ५६८ मते पडली. मतांची टक्केवारी ५०.०७ टक्के होती. त्या पाठोपाठ लोकहितवादी लिडर पार्टीने ५६ हजार ८७५ मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यांच्या मतांची टक्केवारी २१.०१ होती.त्यापाठोपाठ शिवसेनेच्या पारड्यात २७ हजार ५२८ मते पडली.त्यांची टक्केवारी १०.१७ होती.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारांना १६ हजार ४२३ (६.०७ टक्के) मते मिळाली. या सर्व राष्ट्रीय पक्षांच्या मागोमाग अपक्षांनी १४ हजार ५५ (५.१९ टक्के) मते मिळविली. मनसेनेही काही जागा लढवल्या. त्यांना ८ हजार ४०९ मतांवर (३.११ टक्के) समाधान मानावे लागले.
केंद्र व राज्यात सरकार स्थापणाऱ्या भाजपाला मात्र केवळ ५ हजार २७६ मतांचा (१.९ टक्के)जोगवा मिळाला. अशीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली. त्यांना ३ हजार ८०४ मते (१.४० टक्के) मिळाली.
या निवडणुकीत रिपाइं, बसपा, जनतादल सेक्युलर आदी पक्षांचा अक्षरश: धुव्वा उडाला.