लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नगरसेवक नसल्यामुळे महापालिका आणि नागरिक यांच्यात संवाद होत नाही. महापालिकेच्या कामात घोटाळे करता येणार नाही, म्हणून निवडणूक टाळण्याचे सरकारचे धोरण असल्याची टीका उद्धवसेनेचे नेते. आ. आदित्य ठाकरे यांनी बुधवारी केली.
मातोश्री निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आ. ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, मुंबईत प्रदूषण वाढले आहे. हवामानात बदल होत असून, मुंबई दिसेनाशी झाली आहे. सी लिंकवरून गेल्यास १०० मीटरवरील काही दिसत नाही. हवामान खाते अंदाज वर्तवित आहे. अशात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कारभार भलतीकडेच चालला आहे. सरकार काहीही उपाययोजना करीत नाही. कुर्ला येथील मदर डेअरीची जागा कुणालाही देणार नाही, अशी घोषणा तेथील शिंदेसेनेच्या आमदाराने केली होती. पण, आता ती जागा बाजारभावापेक्षा १० टक्के कमी दराने एका बिल्डरला दिली आहे. मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची जागाही त्याच बिल्डरला दिली आहे. मुंबईतील सर्व जमिनी त्याला देण्याचे काम भाजप सरकार करीत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
"पालकमंत्रिपदावरून भांडण्यासाठी वेळ आहे"मुंबईतील अनेक वार्डात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. पाण्याचा दाब कमी आहे. अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे सामाजिक वाद निर्माण होत आहेत. मुंबईचे पाणी गेले कुठे?, गढूळ पाणी का येत आहे, हे पालिकेला विचारल्यास उत्तर मिळत नाही. नागरिक आणि मुंबईकरांना उत्तर द्यायला कुणी पुढे येत नाही. पण, पालकमंत्री पदावरून भांडण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.