Join us

विधान परिषद सभापतिपदासाठी या आठवड्यात निवडणुकीची शक्यता

By दीपक भातुसे | Updated: July 8, 2024 06:55 IST

परिषदेतील वर्चस्व कायम राखण्यासाठी महायुतीची रणनीती

मुंबई : अडीच वर्षांपासून रिक्त विधानपरिषद सभापतिपदासाठी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. महायुती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. 

त्यानंतर विधानसभा निवडणुका होणार असून राज्यात सत्ताबदल झाला तरी विधानपरिषदेत आपले वर्चस्व कायम रहावे यादृष्टीने सभापतिपदाची निवडणूक घेण्याची रणनीती महायुती सरकारने आखली आहे.

महायुतीकडे परिषदेत सर्वाधिक ३१ चे संख्याबळ आहे, तर महाविकास आघाडीकडे २० चे संख्याबळ आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. भाजपच्या जास्त जागा असल्याने भाजपकडून उमेदवार दिला जाईल. राम शिंदे, प्रवीण दरेकर व निरंजन डावखरे ही नावे चर्चेत आहेत. धनगर समाजाचे असलेले राम शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीत धनगर मतांची बेगमी करण्यासाठी भाजपकडून ही खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे. शिंदे हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमधून दोनवेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. फडणवीस सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते. २०१९ मध्ये रोहित पवार यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली.

परिषदेतील महायुती

भाजप     १९अजित पवार गट     ६शिंदेसेना     ३रासप     १अपक्ष     २एकूण     ३१ 

महाविकास आघाडी

 काँग्रेस     ८ उद्धवसेना         ७ शरद पवार गट     २ शेकाप     १ अपक्ष     २एकूण     २०

...म्हणून लांबली निवडणूक

सभापती रामराजे निंबाळकर यांची आमदारकीची मुदत ८ जुलै २०२२ रोजी संपली. त्यानंतर राजकीय फुटीने या पदाची निवडणूक झाली नाही.   

टॅग्स :मुंबईमहायुतीमहाविकास आघाडी