Join us

चहल, भिडे, वेलारसूंची बदली; निवडणूक आयोगाचा दणका, भूषण गगराणी यांच्या नावाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 05:38 IST

नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती मंगळवारी करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू यांची बदली करुन त्यांच्या जागी नवीन नियुक्ती मंगळवारी सायंकाळपर्यंत करा, असे  आदेश निवडणूक आयोगाने काढत राज्य सरकारला दणका दिला.

तीन वर्षे वा त्यापेक्षा अधिक काळ एकाच पदावर असलेल्या आणि निवडणुकीशी संबंधित  अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश तत्कालीन राज्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सरकारला दिले होते. या विषयीचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने दिले होते.  मात्र, देशपांडे यांचीच २९ फेब्रुवारीला बदली करण्यात आली.

नवे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांनीही या तिघांची बदली  करावी असे आदेश दिले होते. मात्र, निवडणुकीशी या अधिकाऱ्यांचा संबंध येत नसल्याने बदलीची गरज नाही अशी भूमिका सरकारने घेतली होती. 

तसेच, ६ राज्यांचे गृह सचिव, हिमाचल प्रदेश व मिझोरामचे सचिव, बंगालच्या पोलिस महासंचालकांना हटविण्याचे आदेश आयोगाने दिले.

निवडणूक आयोगाची लागेल मंजुरी

एखाद्या अधिकाऱ्याची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांच्या नावाची मंजुरी राज्य सरकारला निवडणूक आयोगाकडून घ्यावी लागणार आहे.

भूषण गगराणी यांच्या नावाची चर्चा

मुंबई महापालिका आयुक्त पदासाठी भूषण गगराणी यांचे नाव आघाडीवर आहे. आयुक्तपदी त्यांची नियुक्ती केली जाईल, असा कयास बांधला जात आहे. सध्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाभारतीय निवडणूक आयोग