आचारसंहिता पालनावर निवडणूक आयोगाची नजर
By Admin | Updated: October 7, 2014 01:20 IST2014-10-07T01:20:23+5:302014-10-07T01:20:23+5:30
मतदारसंघातील उमेदवारांकडून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही, यावर निवडणूक आयोगाच्या स्टॅटीक सर्व्हेलन्स टीमची करडी नजर राहणार आहे

आचारसंहिता पालनावर निवडणूक आयोगाची नजर
कल्याण : मतदारसंघातील उमेदवारांकडून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही, यावर निवडणूक आयोगाच्या स्टॅटीक सर्व्हेलन्स टीमची करडी नजर राहणार आहे. या टीमच्या माध्यमातून शहरातील मुख्य नाक्यांवर, चौकांत वाहनांची तपासणी केली जात आहे.
निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडून मतदारांना भुलविण्यास विविध आमिषांचा वापर होत असतो. त्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण, मद्यवाहतूक अशा विविध मार्गांचा अवलंब करून त्यांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला जातो. हे आणि अशा प्रकारचे आचारसंहिता भंग करणारे कृत्य रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने विविध पथके निर्माण केली आहेत. त्यामध्ये भरारी, छायाचित्रण सर्वेक्षण, छायाचित्र पाहणी, उमेदवार खर्च तपासणी या पथकांच्या जोडीने स्टॅटीक सर्व्हेलन्स टीम अर्थातच स्थिर सर्वेक्षण पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. हे पथक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी संबंधित उमेदवार करीत आहेत की नाही, यावर करडी नजर ठेवणार आहे. त्याअंतर्गत कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये विविध ठिकाणी पाहणी पथके तैनात केली आहेत. (प्रतिनिधी)