मुंबईत सध्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामं वेगानं सुरू आहेत. बऱ्याच ठिकाणी रस्ते खोदून ठेवले गेले आहेत. यामुळे नागरिकांचीही गैरसोय होत आहे. ही कामं करताना सुरक्षेची काळजी म्हणून मनपा प्रशासनाकडून कामाच्या ठिकाणी लोखंडी बॅरिकेड लावले जातात. पण हेच लोखंडी बॅरिकेड जीवघेणे ठरतात की काय अशी घटना मुंबई उपनगरातील अंधेरी परिसरात घडली आहे.
अंधेरी पश्चिमेच्या लोखंडवाला परिसरातील ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यात एक वृद्ध महिला रस्त्यावरुन चालत असताना रस्त्याच्या कामासाठी लावण्यात आलेलं एक लोखंडी बॅरिकेड तिच्या अंगावर कोसळलं. सुदैवाने रस्ता रहदारीचा असल्यानं लोक तातडीनं मदतीसाठी धावून आले आणि बॅरिकेड हटवलं गेलं. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियात चांगलंच व्हायरल होत आहे. सोसाट्याचा वारा सुटल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. ज्यामुळे लोखंडी बॅरिकेड कोसळलं. नेमकं त्याचवेळी वृद्ध महिला तिथून जात होती आणि ते तिच्या अंगावर पडलं. यात महिला जागीच खाली पडली. या घटनेत महिला जखमी झाल्याचं कळतं.
सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनपा प्रशासनानंही व्हिडिओ देखल घेत ज्या हँडलवरुन व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे. त्यांच्याकडून घटनेच्या ठिकाणाची विचारणा केली गेली आहे. पण घटनेमुळे मुंबईतील रस्त्यांची कामं जिथं सुरू आहेत तिथं सुरक्षेची कितपत काळजी घेतली जात आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.