शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे

By Admin | Updated: November 10, 2014 00:45 IST2014-11-10T00:45:24+5:302014-11-10T00:45:24+5:30

शिवसेनेच्या आमदारांची बैठक रविवारी होऊन त्यात सेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेऊन शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी कोपरी-पाचपाखाडीचे आमदार एकनाथ शिंदे यांची निवड केली आहे.

Eknath Shinde for Shivsena's group leader | शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे

शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे

नंदकुमार टेणी, ठाणे
शिवसेनेच्या आमदारांची बैठक रविवारी होऊन त्यात सेनेने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेऊन शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी कोपरी-पाचपाखाडीचे आमदार एकनाथ शिंदे यांची निवड केली आहे. विरोधी पक्षात बसण्याचा आपला निर्णय निव्वळ दबावतंत्र न ठरविता सेनेने कायम ठेवला तर एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षनेते होतील. तसे झाले तर त्यांच्या रूपाने ठाण्याला प्रथमच विरोधी पक्षनेतेपद लाभेल.
पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाड यांच्या रूपाने दोन कॅबिनेट मंत्रीपदे लाभली होती. जिल्ह्याला दोन लाल दिवे मिळाले होते. फडणवीस मंत्रिमंडळात ठाण्यातील एका आमदाराला कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे. परंतु, त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र, सेनेने आपला निर्णय कायम ठेवल्यास एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षनेते होतील आणि जिल्ह्याला पहिला लाल दिवा या नव्या राजवटीत लाभेल.
यापूर्वी ठाणे जिल्ह्याला मंत्रीपदे आणि राज्यमंत्रीपदे अनेक लाभलीत. परंतु, विरोधी पक्षनेतेपद मात्र अलीकडच्या काळात प्रथमच लाभले आहे. एकनाथ शिंदे हे कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघातून दोन वेळा तर ठाणे शहर मतदारसंघातून एकदा असे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. जर सेना मंत्रिमंडळात सहभागी झाली असती तर सेनेकडून आपल्या कोट्यातील मंत्री करण्यासाठी ज्या काही नेत्यांची नावे तिने दिली होती, त्यात एकनाथ शिंदेंचे नाव अग्रस्थानी होते. परंतु, तिने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतल्यामुळे मंत्रीपदाचा नसला तरी विरोधी पक्षनेतेपदाचा लाल दिवा त्यांना मिळण्याची चिन्हे आहेत. ठाण्याचे जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून ते काम पाहत आहेत. त्यांच्याच कार्यकाळात त्यांनी ठाणे, पालघर जिल्ह्यांतील लोकसभेच्या चारही जागी महायुतीचे खासदार प्रथमच निवडून आणले होते. संजीव नाईक, सुरेश टावरे, बळीराम जाधव तसेच कल्याणचे खासदार अशा चारही विद्यमान खासदारांना पराभूत करण्याची मोठी कामगिरी त्यांनी पार पाडली होती. कल्याण मतदारसंघात तर निवडणूक लढविण्यात कोणी फारसे उत्सुक नसताना आपल्या डॉक्टर पुत्राला उभे करून त्यांनी त्याचा विक्रमी मतांनी विजय घडवून दाखविला होता. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सरदार म्हणून त्यांचे संघटनेत स्थान आहे. ठाणे जिल्ह्याला शिवसेनेचा बालेकिल्ला करणाऱ्या आनंद दिघे यांच्या स्वर्गवासानंतर त्यांनीच हा बालेकिल्ला अधिक मजबूत केला. शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत जे घडले नाहीत, असे अनेक राजकीय आणि निवडणूक यशाचे विक्रम त्यांनी घडवून दाखविले. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य प्राप्त करून ते विजयी झाले आहेत. उत्तम संघटक, मितभाषी व हार्ड टास्क मास्टर अशी प्रतिमा असलेले एकनाथजी आपली नवी कामगिरी कशी पार पाडतात आणि विधानसभेत शिवसेनेच्या मुलूखमैदान तोफेची भूमिका कशी पार पाडतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Eknath Shinde for Shivsena's group leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.