‘आयुष्याची संध्याकाळ एकत्रित संपावी’
By Admin | Updated: February 13, 2015 04:50 IST2015-02-13T04:50:49+5:302015-02-13T04:50:49+5:30
आयुष्याची संध्याकाळ आवडत्या जोडीदाराच्या हातात हात देऊन संपवावे, यासारखे दुसरे सुख नाही.संध्याकाळचा शेवट त्या जोडीदाराला डोळ्यात ठेवून करण्याचा आनंद नशिबवानाला मिळतोच

‘आयुष्याची संध्याकाळ एकत्रित संपावी’
पूजा दामले, मुंबई
आयुष्याची संध्याकाळ आवडत्या जोडीदाराच्या हातात हात देऊन संपवावे, यासारखे दुसरे सुख नाही.संध्याकाळचा शेवट त्या जोडीदाराला डोळ्यात ठेवून करण्याचा आनंद नशिबवानाला मिळतोच. हा आनंद घेण्यासाठी वयाची सत्तरी पार केलेल्या एका जोडप्याने इच्छामरणाचा पर्याय निवडला आहे. हा आनंद अस्तित्त्वात आणण्यासाठी गेली तीस वर्षे हे जोडपे प्रयत्न करत आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश आले नाही.
ठाकूरद्वार झावबावाडी येथे राहणाऱ्या लवाटे दाम्पत्याला इच्छा मरण स्वीकारायचे आहे. नारायण लवाटे हे ८४ वर्षांचे असून इरावती लवाटे या ७६ वर्षांच्या आहेत. नारायण लवाटे हे एस.टी. मध्ये नोकरी करत होते. तिथून निवृत्त झाल्यावर आजही एस.टी. कामगार युनियनचे काम पाहतात. कामगारांना सल्ला देण्यासाठी रोज गिरगावहून मुंबई सेंट्रलला एकटे बसने प्रवास करतात. इरावती लवाटे या निवृत्त होताना एका शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. त्या गिरगावातील विविध संस्थांमध्ये कार्यरत होत्या. पण सध्या पायाला दुखापत असल्यामुळे घरी असतात. दोघांनी ही वयाची पंचाहत्तरी ओलांडली असली तरीही आरोग्याची त्यांना चांगली साथ लाभलेली आहे. वय असूनही कोणता आजार दोघांना नाही. यामुळे दैनंदिन कार्य ते स्वत:च करतात. कोणाच्याही आधाराची त्यांना गरज भासत नाही. आयुष्यभर अंगी बाणलेले स्वावलंबन आयुष्याच्या शेवटी देखील आपल्या बरोबर राहावे आणि आपल्या मृत्यूनंतर कोणाला तरी आपली मदत व्हावी यासाठी त्यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्ता आमच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस हा अगदी सारखा आणि एकच आहे. या जगण्याला काहीच अर्थ उरलेला नाही. म्हणून इच्छा मरण हवे आहे. इच्छा मरण हवे असल्यास काय करावे लागेल याचा शोध घ्यायला १९८५ साली मी सुरूवात केली. गेल्या ३० वर्षांमध्ये अनेक ठिकाणी पत्रव्यवहार केले आहेत. राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राजकीय नेते सर्वांना पत्रे पाठवलेली आहेत.