Join us
Daily Top 2Weekly Top 5

भीम आर्मीच्या संविधान जनजागृती यात्रेत एक वही एक पेनचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2022 19:13 IST

भीम आर्मीच्या संविधान जनजागृती यात्रेत एक वही एक पेनचा जागर करण्यात आला. 

मुंबई: भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेने संविधान दिन ते महापरीनिर्वाण दिन अशा १२ दिवसीय संविधान जनजागृती यात्रेचे आयोजन केले असून भारतीय संविधानाच्या जागृतीसह हारफुलांऐवजी वह्या पेन पुस्तक संगणक मोबाईल आदी शैक्षणिक साहित्य देवून या यात्रेचे स्वागत करावे असे आवाहन या संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. भीम आर्मीने २६ नोव्हेंबर या संविधान दिनापासून६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिन अशा राज्यस्तरीय पुणे ते मुंबई संविधान जनजागृती यात्रेचे आयोजन केले आहे. 

भारतीय संविधान तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक विचारांचा जागर या जनजागृती यात्रेत करण्यात येणार असून या यात्रेच्या स्वागतासाठी हारफुले फटाके तसेच ईतर अनावश्यक खर्च टाळून केवळ वह्या, पेन पेन्सिल, पुस्तके, वापरात नसलेले संगणक,मोबाईल, व इतर शैक्षणिक साहित्य देवून जनजागृती यात्रेचे स्वागत करावे असे आवाहन भीम आर्मीच्या वतीने करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार राजू झनके यांच्या संकल्पनेतून साकार झालेले  'एक वही, एक पेन अभियान  भीम आर्मीच्या वतीने  वतीने संविधान यात्रेत राबविण्यात येणार असून राज्यभरातून जमा झालेले हे शैक्षणिक साहित्य दादर चैत्यभूमी येथे नेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शैक्षणिक साहित्यांनी अभिवादन करण्यात येईल.समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून मदतीचा हात देण्यासाठी हे अभियान राबविणार असल्याची माहीती या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सीताराम गंगावणे यांनी दिली आहे. 

पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून सुरू होणारी संविधान यात्रा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जाणार असून ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी दादर येथे भीम आर्मी संस्थापक ड चंद्रशेखर आजाद व राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन सभा घेऊन या यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.

  

टॅग्स :मुंबईभीम आर्मी