Join us  

आठ हजार टन डाळिंब निर्यात घटली; शेतकऱ्यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 10:47 PM

चांगल्या भावामुळे देशभरात ८४५ कोटी पदरात

- बाळासाहेब बोचरे मुंबई : औषधी गुणधर्म असलेल्या डाळिंबाला वर्षभर विदेशात मागणी असताना त्याचबरोबर यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात दरातही चांगली वाढ झालेली असताना केवळ मजूर आणि वाहतूक यामधील गोंधळामुळे सुमारे आठ हजार टन डाळिंब निर्यात होऊ शकलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

सोलापुरातील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या संचालक डॉ. ज्योत्स्ना शर्मा यांनी याबाबत केंद्रीय कृषी आयोगाला अहवाल पाठवला असून यामध्ये २५ टक्के डाळिंब क्षेत्राला कोरोनाचा फटका बसल्याचे म्हटले आहे. देशात २.९२ लाख हेक्टर क्षेत्रावर डाळिंब असून त्यापैकी ६५ हजार हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात १.७ लाख हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाचे पीक घेतले जाते. त्यामधून वीस लाख टन डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी ५५ ते ६० हजार टन डाळिंब महाराष्ट्रातून निर्यात केली.

गतवर्षी निर्यातक्षम डाळिंबाला किलोमागे सरासरी शंभर रुपये भाव मिळाला होता. यावर्षी १३० रुपये भाव मिळाल्याने निर्यात कमी होऊनही शेतकºयाच्या हातात चार पैसे आले. राज्य पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक भास्कर पाटील म्हणाले, मजूर व वाहनचालक उपलब्ध नसल्याने सगळी साखळीच विस्कळीत झाली. गतवर्षी एप्रिल व मे महिन्यात ३,२७१ टन निर्यात केली होती. यंदा दोन महिन्यांत केवळ १७७३ टन निर्यात झाली. डाळिंबाची निर्यातदार पंकज खंडेलवाल म्हणाले, मार्चअखेर ५० हजार टनही निर्यात झाली नाही.डाळिंबाला आखाती देशात चांगली मागणी आहे.

यंदा दरही चांगला होता. मात्र पुरेशा निर्यातीअभावी डाळिंबे मार्चनंतर ३० रुपयांवर आली.- शिवाजीराव भानवसे, शेतकरी, आढेगाव, सोलापूर

गेल्यावर्षी देशभरातून ६८ हजार टन डाळिंबाची निर्यात करून ६८५ कोटी रुपये उलाढाल झाली. यंदा मार्चअखेर ६५ हजार टन निर्यात होऊन सुद्धा दर चांगला मिळाल्याने शेतकºयांना ८४५ कोटी मिळाले.- ज्योत्स्ना शर्मा, संचालक, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर

टॅग्स :शेतकरी