मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना सुविधा देण्याच्या उद्देशाने मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अतिरिक्त सेवा चालविण्यात येणार आहेत. नियोजित वेळापत्रकानंतर या विशेष सेवा चालविण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईमध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण दरम्यान दोन आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल दरम्यान दोन अशा एकूण चार सेवा चालविण्यात येणार आहेत, तर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यान चार सेवा चालविण्यात येणार आहेत. तसेच गर्दी आणि गरजेनुसार त्यांची संख्यादेखील वाढविली जाऊ शकते. त्या गाड्यांची वेळ लवकरच जाहीर केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. चर्चगेट, मरिन लाईन्स आणि गिरगाव स्थानकांवर गर्दी अपेक्षित असल्याने या ठिकाणी अतिरिक्त जीआरपी तसेच आरपीएफ तैनात करण्यात येणार आहेत.