Join us

कर्नाक पूल ५ जूनपर्यंत सेवेत आणण्याचे प्रयत्न; अतिरिक्त पालिका आयुक्तांकडून आढावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 10:00 IST

सुट्या भागांचे जोडकाम, तुळई बसविण्याची कार्यवाही, पोहोचमार्ग बांधणी, भार चाचणी (लोड टेस्ट) आदी कामकाजाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या १५४ वर्षे जुन्या कर्नाक पुलाची मुंबई महापालिका पुनर्बांधणी करीत आहे. या प्रकल्पातील दुसऱ्या बाजूच्या लोखंडी तुळईचे  (गर्डर) सुटे भाग दाखल झाले आहेत. उर्वरित सुटे भाग २० डिसेंबरपर्यंत प्रकल्पस्थळी दाखल होणे अपेक्षित आहे. वेळापत्रकानुसार  काम पूर्ण झाल्यास ५ जून २०२५ पर्यंत पूल वाहतुकीस खुला करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. 

सुट्या भागांचे जोडकाम, तुळई बसविण्याची कार्यवाही, पोहोचमार्ग बांधणी, भार चाचणी (लोड टेस्ट) आदी कामकाजाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. दक्षिण बाजूची लोखंडी तुळई रेल्वे भागावर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी गुरुवारी प्रकल्पस्थळास भेट देऊन कामाचा आढावा घेतला. मध्य रेल्वेकडून  ‘ब्लॉक’ मिळाल्यानंतर १९ जानेवारीपर्यंत तुळई बसवण्याचे काम पूर्ण होईल, असे बांगर यांनी सांगितले.

कालापव्यय टाळणार पूर्व आणि पश्चिम दिशेच्या पोहोचमार्गासाठी (ॲप्रोच रोड) खांब बांधणीचा पहिला टप्पा दिनांक १५ मार्चपर्यंत पूर्ण करणे, १७ एप्रिलपर्यंत खांब उभारणी पूर्ण करणे, ३ मे पर्यंत पोहोच रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि १ जून रोजी भार चाचणी करण्याचे नियोजन आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ॲण्टीक्रॅश बॅरिअर्स, विजेचे खांब उभारण्यासाठी होणारा कालापव्यय टाळण्यासाठी ही कामे समांतरपणे पूर्ण केली जाणार असल्याचेही अभिजित बांगर यांनी सांगितले.