सिडकोचे बलुतेदारांच्या विकासासाठी प्रयत्न
By Admin | Updated: May 5, 2015 00:26 IST2015-05-05T00:26:19+5:302015-05-05T00:26:19+5:30
प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या १० गावांतील बारा बलुतेदारांचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी सिडकोने कंबर कसली आहे

सिडकोचे बलुतेदारांच्या विकासासाठी प्रयत्न
नवी मुंबई : प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या १० गावांतील बारा बलुतेदारांचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी सिडकोने कंबर कसली आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमार्फत सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून सध्या त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे.
विमानतळामुळे प्रभावित होणाऱ्या दहा गावांत सुमारे २८२ ग्राम कारागीर आहेत. हे सर्वच बाराबलुतेदारांमध्ये मोडतात. त्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देणे, विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे, लघु उद्योग स्थापन करून बँकांमार्फत कर्ज मिळवून देणे आदी प्रक्रिया सोयीची व्हावी, यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षण अहवालाच्या आधारे प्रशिक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्राम कारागिरांच्या अल्पप्रतिसादामुळे प्रशिक्षणाची प्रक्रिया सध्या टप्प्याटप्याने सुरू आहे. असे असले तरी पुढील पाच-सहा महिन्यांत त्याला गती देण्यात येईल, असे सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी सांगितले. बाराबलुतेदारांचा विकास साधण्याचा सिडकोचा उद्देश असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)