जीर्ण जलवाहिन्यांना फुटीचे ग्रहण

By Admin | Updated: November 30, 2014 23:09 IST2014-11-30T23:09:00+5:302014-11-30T23:09:00+5:30

या व्यतिरिक्त पाण्याची चोरीही मोठ्या प्रमाणात होतअसून ती रोखण्यास एमजेपी अपयशी ठरत आहे.

Eerily watercolors get split | जीर्ण जलवाहिन्यांना फुटीचे ग्रहण

जीर्ण जलवाहिन्यांना फुटीचे ग्रहण

प्रशांत शेडगे, पनवेल
झोपडपट्टीधारकांकडून पाणी चोरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या जलवाहिनीची तोडफोड करण्याचे प्रकार पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे या वाहिनीला फुटीचे ग्रहण लागून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. या प्रकारामुळे एमजेपी अधिकारी आणि कर्मचारीही त्रस्त झाले असून रोज नवनवीन ठिकाणी जलवाहिनी फुटत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून जलवाहिन्या बदलण्याचा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडला आहे.
जीवन प्राधिकरणाच्या भोकरपाडा येथील जवाहरलाल नेहरू शुद्धीकरण केंद्र ते जेएनपीटी व पनवेल या दरम्यान २८ वर्षापूर्वी ११५ एमएलडी क्षमतेची जलवाहिनी टाकण्यात आली होती. या वाहिनीद्वारे पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर व आजूबाजूच्या १९ गावातील सुमारे १५ लाख रहिवाशांना पाणीपुरवठा केला जातो. त्याचबरोबर पळस्पे फाटा येथून टी पॉर्इंट काढून जेएनपीटीलाही पाणी दिले जाते. आजूबाजूची गावेही यावर अवलंबून आहेत. परंतु ही वाहिनी जीर्ण झाली असून अनेक ठिकठिकाणी गंजली आहेत. परिणामी पाण्याच्या दाबाने ती वारंवार फुटत आहेच, शिवाय सुमारे तीस किमी अंतर असलेल्या या जलवाहिनीलगत अनेक अनधिकृत झोपड्या तयार झाल्या आहेत. ते झोपडपट्टीवासीय पाण्यासाठी जलवाहिनी फोडत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
आसूडगाव, भिंगारी, पोदी, नवीन पनवेल, करंजाडे, वडघर बंबईचा पाडा या ठिकाणी जलवाहिनीला फोडण्याच्या सर्वाधिक घटना घडतात. या ठिकाणी वारंवार डागडुजी केली तरी दुसऱ्या दिवशी इतर ठिकाणी जलवाहिनी फोडली जाते. त्यापैकी आसूडगाव, करंजाडे येथील प्रश्न अधिक जटील बनला आहे. इतर ठिकाणीही परिस्थिती फारशी वेगळी नसून दररोज लाखो लिटर पाण्याची गळती होत आहे. या व्यतिरिक्त पाण्याची चोरीही मोठ्या प्रमाणात होतअसून ती रोखण्यास एमजेपी अपयशी ठरत आहे.
वाहिनीच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सातत्याने शटडाऊन घेतला जात आहे. त्यामुळे पनवेलकर आणि सिडको वसाहतवाल्यांना तीन चार दिवस पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. अनेकदा वेळेत काम होत नसल्याने पाणीपुरवठाही अखंडीत होत नसून केवळ पॅच मारण्याचे काम प्राधीकरणाकडून होत आहे. परिणामी प्रश्न निकाली निघत नाही. पाणी गळती आणि चोरीचे प्रकार थांबत नसून एकीकडे पाण्याची टंचाई असताना दुसरीकडे अशा प्रकारे पाण्याची नासधूस होत चालली आहे.

Web Title: Eerily watercolors get split

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.