शिक्षणमंत्री तावडे यांना इतिहासाचा विसर
By Admin | Updated: February 21, 2015 03:30 IST2015-02-21T03:30:04+5:302015-02-21T03:30:04+5:30
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा इतिहास कच्चा आहे का, अशी शंका निर्माण होत आहे. शुक्रवारी तावडे फेसबुकवरून महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी करून मोकळे झाले.

शिक्षणमंत्री तावडे यांना इतिहासाचा विसर
फेसबुकवर पोस्ट : आजच साजरी केली महात्मा फुलेंची जयंती
जयेश शिरसाट - मुंबई
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा इतिहास कच्चा आहे का, अशी शंका निर्माण होत आहे. शुक्रवारी तावडे फेसबुकवरून महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी करून मोकळे झाले. मुळात महात्मा फुले यांची जयंती ११ एप्रिलला, तर स्मृतिदिन २८ नोव्हेंबरला आहे.
आता छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे महात्मा फुले यांचीही जयंती तिथीप्रमाणे साजरी होणार का, अशा कॉमेंट्स तावडेंच्या पोस्टवर आल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर दिवसभर हीच चर्चा रंगली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत स्वत:चा फोटो असलेल्या विनोद तावडेंच्या फेसबुक अकाउंटवरून सकाळी अकराच्या सुमारास महात्मा फुलेंचा फोटो पोस्ट करण्यात आला. त्यावर स्त्रीशक्तीचा आत्मविश्वास जागवणारे महात्मा, महात्मा फुले जयंती, असे स्पष्ट लिहिलेले आहे. फोटोसोबत महात्मा फुलेंच्या कार्याची दोनेक वाक्यांत केलेली स्तुतीही जोडलेली आहे. तावडेंनी हा फोटो पोस्ट करताच त्यावर प्रतिक्रिया उमटल्या. पहिलीच प्रतिक्रिया राहुल जी. कांबळे यांनी व्यक्त केली. ती अशी, साहेब (तावडे) माहिती चुकीची आहे. महात्मा फुलेंची जयंती ११ एप्रिलला आहे, कॅलेंडर चेक करा. त्यानंतर दिनकर बोकड नावाच्या अकाउंटवरून इथेही तिथीप्रमाणे जयंती साजरी करणार का, अशी प्रतिक्रिया आली. अप्पासाहेब टकले यांनीही अशीच प्रतिक्रिया नोंदवली. महात्मा फुलेंचीही छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे दोन वेळा जयंती साजरी होणार का, असा प्रश्नही फेसबुकवर तावडे यांना विचारण्यात आला. विशेष म्हणजे अशा प्रतिक्रिया आल्यामुळे तावडेंनी अकाउंटवरून ती पोस्ट संध्याकाळी उशिरा हटवली.
फेसबुकवरील पोस्टबाबत विचारणा केली असता विनोद तावडे म्हणाले, अनावधानाने हा प्रकार घडला. मी बाहेर होतो. मात्र चूक लक्षात येताच ती पोस्ट काढली. चूक दाखवून दिल्याबद्दल ‘लोकमत’चे आभार.