Join us  

मराठी भाषेत शिक्षण झालंय, मग BMC मध्ये नोकरी नाही?; पीडित काढणार शिवसेना भवनावर मोर्चा

By प्रविण मरगळे | Published: February 16, 2021 9:49 AM

BMC denied jobs to Marathi language teachers, where Shiv Sena is in power: शिवसेनेचा जन्मच मुळात मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झाला होता. त्याच शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेतील नियमावर प्रश्न उभे राहिले आहेत.

ठळक मुद्देबीएमसी शाळेत निवड झाल्यानंतर खासगी शाळेत नोकरी करणाऱ्या जागृती पाटील यांनी तेथील नोकरीचा राजीनामा दिलातुम्ही १० पर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेतलं म्हणून तुम्हाला घेऊ शकत नाही - महापालिकाज्या मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला, त्याच शिवसेनेची मुंबई महापालिकेवर सत्ता आहे

मुंबई – महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या एका नियमावर आता अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मुंबई महापालिकेच्या(BMC) शाळांमध्ये २५२ शिक्षकांची निवड झाल्यानंतरही त्यांना नोकरीपासून वंचित ठेवण्यात आलं आहे. कारण या शिक्षकांनी शालेय शिक्षण मराठी माध्यमातून घेतलं आहे, इंग्रजी माध्यमातून नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले जात आहेत.(BMC Denied job who taking education in Marathi Medium)

गेल्या २५ वर्षापासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची(Shivsena) सत्ता आहे. शिवसेनेचा जन्मच मुळात मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झाला होता. त्याच शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेतील नियमावर प्रश्न उभे राहिले आहेत. या नियमाविरोधात १८ फेब्रुवारीरोजी पीडित उमेदवार मोर्चा काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपली व्यथा मांडणार आहेत.

मागील वर्षी बीएमसी शाळेत निवड झाल्यानंतर खासगी शाळेत नोकरी करणाऱ्या जागृती पाटील यांनी तेथील नोकरीचा राजीनामा दिला. महापालिकेच्या शाळेत शिकवायला मिळणार अशी जागृतीची अपेक्षा होती. परंतु त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मराठी माध्यमातून तुमच्या शाळेच्या सुरुवात झाल्यामुळे तुम्हाला नोकरी देऊ शकत नाही. तेव्हापासून १ वर्ष झालं जागृती तिच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात विविध ठिकाणी मदतीची याचना करत आहे. हीच अवस्था अमित पाटील यांची आहे. अनेक अधिकाऱ्यांना भेटूनही त्यांना दिलासा मिळाला नाही असं वृत्त एनडीटीव्हीनं दिलं आहे. 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षेत आम्ही सगळे मेरिटमध्ये आलो आहोत, आम्हाला सर्वाधिक मार्क्स मिळाले, आता बीएमसीने पहिली ते दहावी ज्यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलं आहे, ज्यांना कमी मार्क्स मिळालेत अशांना नोकरीवर ठेवलं आहे परंतु आम्हाला नोकरी दिली नाही असं जागृती पाटील म्हणाल्या. तर अमित पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात कोणतीही परिक्षा देणं सोपं नाही, आम्ही ते केलं, पडताळणीही झाली, त्यानंतर महापालिकेने सांगितले तुम्ही १० पर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेतलं म्हणून तुम्हाला घेऊ शकत नाही. आम्ही त्यांना विनवणी केली की असं करू नका, १० वर्षातून एकदा सरकारी नोकरी मिळते तुम्ही असं केलं तर आम्ही कोणाकडे जाणार? असा प्रश्न उपस्थित केला.

त्यामुळे ज्या मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला, त्याच शिवसेनेची मुंबई महापालिकेवर सत्ता आहे, तिथे मराठीत शिक्षण घेतल्यामुळे नोकरी नाकारण्यात आली. याच्याविरोधात पीडित उमेदवार शिवसेना भवनाबाहेर आंदोलन करण्याचीही तयारी करत आहे. महाराष्ट्र स्टूडेंट्स यूनियनचे संस्थापक सिद्धार्थ इंगोले यांनी सांगितले की, आम्ही १८ तारखेला छत्रपती शिवाजी महाराज पार्क पासून शिवसेना भवन मोर्चा काढणार आहोत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आमची व्यथा मांडणार आहोत, तुमच्या सत्तेत मराठी माणसासोबत काय होत आहे हे सांगणार आहोत.

महापालिकेचे स्पष्टीकरण  

महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, महापालिकेच्या दोन प्रकारच्या शाळा आहेत, त्यात मराठी आणि इंग्रजी दोन्ही शिक्षण दिलं जातं, इंग्रजी शाळांना आम्हाला कॉन्व्हेंट शाळेसारखं बनवायचं आहे, त्यात इंग्रजी शाळेत केवळ इंग्रजीत शिक्षण घेतलेल्यांना प्राधान्य दिलं जात आहे. तसेच दुसऱ्या प्रकारच्या शाळेत मराठी भाषेत शिक्षण घेतलेल्यांना नोकरीत घेतलं जात आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाउद्धव ठाकरेमराठीशिवसेनाशिक्षक