टॅबबाबत शिक्षण समिती अंधारात

By Admin | Updated: September 9, 2015 04:43 IST2015-09-09T04:43:59+5:302015-09-09T04:43:59+5:30

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी यंदा आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या वैधानिक

Education Committee in the dark about the tab | टॅबबाबत शिक्षण समिती अंधारात

टॅबबाबत शिक्षण समिती अंधारात

- तेजस वाघमारे,  मुंबई
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी यंदा आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या वैधानिक शिक्षण समितीकडून मंजूर करून घेण्यात आला. मात्र, त्यानंतर आजवर टॅबमधील अभ्यासक्रमाबाबत आणि इतर अ‍ॅप्सच्या समावेशाबाबत समिती सदस्यांना अंधारात ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.
पालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आठवीच्या विद्यार्थ्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवार (९ सप्टेंबर) रोजी टॅबचे वितरण करण्यात येणार आहे. परंतु या कार्यक्रमाच्या काही तास आधीच टॅबचे राजकारण पुढे आले आहे. शिवसेनेची संकल्पना असलेला टॅब खरेदीचा प्रस्ताव पालिकेच्या शिक्षण विभागाच्या बैठकीत मंजूर करून घेण्यात आला. मात्र, त्यानंतर समितीच्या सदस्यांना आजवर याबाबत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह सर्व पक्षांच्या समिती सदस्यांनी पालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तीन वर्षांत आठवीच्या १२ हजार विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यानुसार टॅबमध्ये समाविष्ट करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाबाबत पालिका प्रशासनाने शिक्षण समितीला विश्वासात घेणे आवश्यक होते. मात्र, समिती सदस्यांना अंधारात ठेवूनच टॅबचा कारभार होत असल्याने एका सत्ताधारी सदस्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भांडवलदारच शैक्षणिक अभ्यासक्रम ठरविणार असतील, तर ही प्रवृत्ती शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत घातक असल्याचेही सत्ताधारी सदस्याने नमूद केले.
टॅबमध्ये समाविष्ट करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाबाबत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे मत विचारात घेणे आवश्यक होते. मात्र, महापालिकेने अशी कोणतीही तसदी घेतली नसल्याबद्दल समिती सदस्य प्रकाश दरेकर यांनी खेद व्यक्त केला आहे. टॅबला विरोध नसून सत्ताधाऱ्यांनी सदस्यांना अंधारात ठेवणे योग्य नसल्याचेही दरेकर या वेळी म्हणाले.

३0 विद्यार्थ्यांना टॅब
बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ३० विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार आहेत. शिक्षणाधिकारी शांभवी जोगी यांच्याशी संपर्क साधला असता १२ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येईल, असे सांगितले.

Web Title: Education Committee in the dark about the tab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.