मुंबई : सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या घोटाळ्याचा तपास आता ईडीदेखील करणार आहे. शिवाजी पार्क पोलिसांत दाखल गुन्ह्याच्या आधारे ईडीनेदेखील गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. या गुन्ह्यातील मास्टरमाइंडने २०० कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून परदेशात पाठविल्याचा ईडीला संशय असून, त्याचा तपास प्रामुख्याने करण्यात येणार आहे.
टोरेस प्रकरणात सर्वप्रथम एका भाजी विक्रेत्याने शिवाजी पार्क पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यावेळी एकूण ६६ गुंतवणूकदारांना एकूण १३ कोटी ८५ लाख रुपयांना गंडा घातल्याचे दिसून आले होते. मात्र, त्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याचा तपास सुरू केल्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती अधिक असल्याचे दिसून आले. एकूण दोन हजार गुंतवणूकदारांना ३७ कोटी रुपयांना गंडा घातल्याचे दिसून आले आहे.
कंपनीत एकूण सव्वा लाख लोकांनी गुंतवणूक केल्याची माहिती असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी फेब्रुवारी २०२३मध्ये स्थापन करण्यात आलेल्या प्लॅटिनम हर्न प्रा. लि. कंपनीच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.