Join us
Daily Top 2Weekly Top 5

डिनो मोरयाला ईडीचे समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 10:24 IST

Dino Morea: मिठी नदीच्या सफाई कामामध्ये झालेल्या ६५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने शनिवारी अभिनेता डिनो मोरया याला चौकशीसाठी समन्स जारी केले आहे. पुढील आठवड्यात त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

मुंबई - मिठी नदीच्या सफाई कामामध्ये झालेल्या ६५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने शनिवारी अभिनेता डिनो मोरया याला चौकशीसाठी समन्स जारी केले आहे. पुढील आठवड्यात त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. याप्रकरणी ईडीने शुक्रवारी मुंबई आणि केरळमध्ये १५ ठिकाणी छापेमारी केली होती. मुंबईतील छाप्यांदरम्यान डिनो मोरयाच्या निवासस्थानीही छापेमारी करण्यात आली होती.

मिठी नदीच्या सफाईचे काम २००७ ते २०२१ या कालावधीत होणार होते. याकरिता कंत्राट देण्यात आले. मात्र, हे काम प्रत्यक्षात झालेच नसल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई महापालिकेचे तीन अधिकारी, पाच खासगी कंत्राटदार, तीन मध्यस्थ आणि एका खासगी कंपनीचे दोन कर्मचारी अशा १३ जणांविरोधात गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेअंतर्गत विशेष तपास पथकाने गुन्हा दाखल करत तपास केला आहे.

अभिनेता डिनो मोरिया आणि त्याच्या भावाची देखील याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दोन वेळा चौकशी केली होती. दरम्यान, मिठी नदीच्या सफाईसाठी जे मशीन मागविण्यात येणार होते त्याचे कंत्राट फुगवून काही विशिष्ट कंत्राटदारांना त्याचा फायदा व्हावा, अशा पद्धतीने मांडण्यात आल्याचा अधिकाऱ्यांना संशय असून त्या दृष्टीने देखील तपास होणार आहे.

टॅग्स :डिनो मोरियामुंबई