मुंबई - सर्वसामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या टोरेस कंपनीच्या घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी ईडीने मुंबई आणि जयपूर या दोन शहरांत १३ ठिकाणी छापेमारी केली. यापैकी मुंबईत १०, तर जयपूरमध्ये तीन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या छापेमारी दरम्यान कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची काही कागदपत्रे ईडीच्या हाती लागली आहेत.
टोरेस गैरव्यवहारप्रकरणी सर्वप्रथम मुंबईत शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर नवी मुंबई आणि ठाणे येथेही कंपनीच्या विरोधात काही गुन्हे दाखल झाले होते. कंपनीने मनी लाँड्रिंग केल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने काही दिवसांपूर्वी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत.
- या प्रकरणात सर्वप्रथम एका भाजी विक्रेत्याने शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी कंपनीने ६६ गुंतवणूकदारांना १३ कोटी ८५ लाख रुपयांना गंडा घातल्याचे आढळले होते. - आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यातून कंपनीत सुमारे सव्वा लाख लोकांनी गुंतवणूक केल्याचे स्पष्ट झाले. कंपनीने १८ हजार लोकांची फसवणूक केली.
हवालाद्वारे २०० कोटी परदेशी पाठवले?याप्रकरणी फेब्रुवारी २०२३ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या प्लॅटिनम हर्न प्रा. लि. कंपनीच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते. तसेच, या गुन्ह्यातील मास्टरमाईंडने २०० कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून परदेशात पाठविल्याचा ईडीला संशय आहे. त्याचा तपास प्रामुख्याने करण्यात येणार आहे.