माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:05 AM2021-05-12T04:05:38+5:302021-05-12T04:05:38+5:30

१०० कोटी वसुली प्रकरण; प्राथमिक तपासानंतर बजाविणार समन्स लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात अंमलबजावणी ...

ED files case against former Home Minister Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल

Next

१०० कोटी वसुली प्रकरण; प्राथमिक तपासानंतर बजाविणार समन्स

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) मनी लाँन्ड्रिंगअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुंबईचे तत्कालीन पाेलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) यासंदर्भात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडी आता त्यातील आर्थिक व्यवहारांबाबत देशमुख यांच्याकडे चौकशी करणार आहे. प्राथमिक तपासानंतर त्यांना त्यासाठी समन्स बजाविले जातील, असे सूत्रांनी सांगितले.

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी २० फेब्रुवारीला ‘लेटर बॉम्ब’द्वारे देशमुख यांच्यावर आरोप केले होते. त्याबद्दल उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या प्रकरणाचा प्राथमिक तपास करून देशमुख व अन्य अनोळखी इसमावर सोमवारी गुन्हा दाखल केला. दरम्यान, देशमुख यांच्या घर व कार्यालयावर छापे टाकण्यात आले होते. ईडी त्याच अहवालाच्या आधारे शंभर कोटी वसुली प्रकरण, बदल्यांसाठी पैसे घेण्यात आल्याच्या आरोपाचा तसेच अन्य आर्थिक बाबींचा तपास करणार आहे.

कथित रक्कम कोणत्या माध्यमातून घेण्यात आली, तिचा वापर कुठे व कसा झाला, देशमुख यांच्या मुलांच्या नावावरील कंपन्या, त्यांच्या नातेवाइकांच्या नावे असलेल्या कोलकात्यातील शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यात आली का, या सर्वांचा तपास ईडी करणार आहे. याबाबत ईसीआयआर सखोल तपासल्यानंतर देशमुख यांना चौकशीसाठी पाचारण केले जाणार असल्याचे समजते.

* ...तर इतरांची नावे येणार

ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अनिल देशमुख आणि अन्य असा उल्लेख आहे. त्यामुळे भविष्यात पुरावा सापडल्यास या प्रकरणात आणखी काहींना आरोपी केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

------------------

Web Title: ED files case against former Home Minister Anil Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.