Join us  

‘ईडी’मुळे राज यांच्या हाती आयते कोलीत; निवडणुकीसाठी मिळाला मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 6:11 AM

शांतता राखण्याच्या आवाहनाला कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भभवला नाही. समाजमाध्यमांत मात्र मनसे कार्यकर्ते भलतेच आक्रमक झाले होते.

- गौरीशंकर घाळेमुंबई : कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चौकशीला पाचारण केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून या प्रकरणामुळे मरगळलेल्या पक्षसंघटनेत चैतन्य निर्माण झाले आहे.लोकसभा निवडणूक प्रचारात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधत वातावरण ढवळून काढले होते. काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते निष्प्रभ ठरत असताना राज यांनी एकहाती विरोधाचा किल्ला लढविला होता. निकालावर याचा परिणाम झाला नसला तरी मनसेसाठी राजकीय स्पेस तयार झाली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांनी ईव्हीएमचा मुद्दा हाती घेत भाजपविरोधात आघाडी उघडली होती. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. २१ आॅगस्टला ईव्हीएमविरोधात विरोधकांचा मोर्चाही निघणार होता. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे हा मोर्चा पुढे ढकलण्यात आला. विरोधी नेत्यांनी ईव्हीएमच्या मुद्दा लावून धरला असला तरी त्याचा थेट परिणाम जाणवत नव्हता.ईडीच्या नोटीसीने राज यांच्यासह विरोधकांचा हातात आयतेच कोलित मिळाले आहे.भाजपविरोधात भूमिका घेणाऱ्या नेत्यांविरोधात सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचा वापर केला जात आहे. राजकीय सूडबुद्धीने चौकशांचे शुक्लकाष्ट मागे लावण्याचे भाजपचे धोरण असल्याचा आरोप विरोधकांनी सुरू केला आहे. हे सर्व थांबायला हवे, असे मतही विरोधकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ईडीच्या चौकशीमुळे राज ठाकरे चर्चेत आले आहेत. चौकशीसाठी ईडी कार्यालयाकडे जाताना राज ठाकरे यांच्या सोबत त्यांचा संपूर्ण परिवार होता. त्यातून या एकंदर चौकशीच्या प्रकरणाला वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न झाला.राज ठाकरे यांनी केलेल्याशांतता राखण्याच्या आवाहनाला कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भभवला नाही. समाजमाध्यमांत मात्र मनसे कार्यकर्ते भलतेच आक्रमक झाले होते. राज यांच्याविरोधातील वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला जात होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सहकुटुंब चौकशीला जाण्यावरून राज यांच्यावर टीका केली. त्यामुळे दमानियांना मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. चिडलेल्या महिला कार्यकर्त्यांनीतर दमानिया यांच्या घरावर मोर्चा काढण्यासाठी मुंबईतील त्यांच्या घराचाही शोध घेण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.स्वत: राज यांनी योग्यवेळी या विषयावर सविस्तर बोलणार असल्याचे जाहीर केले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत आणखी एक मुद्दा यानिमित्ताने राज यांच्या हाती आला आहे.

टॅग्स :राज ठाकरेअंमलबजावणी संचालनालय