पर्यावरणपूरक ग्रीन बिल्डिंग
By Admin | Updated: June 4, 2015 22:28 IST2015-06-04T22:28:31+5:302015-06-04T22:28:31+5:30
ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका लक्षात घेता आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर ग्रीन बिल्डिंग उभारणीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

पर्यावरणपूरक ग्रीन बिल्डिंग
मुंबई : ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका लक्षात घेता आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर ग्रीन बिल्डिंग उभारणीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आर्थिक राजधानी मुंबईतही ग्रीन बिल्डिंगचा प्रामुख्याने विचार केला जात असून, अशा पर्यावरणस्नेही इमारतींंना मालमत्ता करात २० टक्के सवलत देण्याबाबत महापालिका विचाराधीन आहे.
जागतिक तापमानवाढीचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत असून, यावर उपाय म्हणून आता आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून पर्यावरणस्नेही इमारतींचा विचार सुरू झाला आहे. जी इमारत कमी ऊर्जा, पाणी आणि नैसर्गिक साधनसंपत्ती वापरून कमीत कमी ‘कचरा’ तयार करते व तरीही नेहमीच्या इमारतीच्या तुलनेत रहिवाशांसाठी अधिक आरोग्यकारक असते, अशा इमारती ग्रीन बिल्डिंग म्हणून ओळखल्या जातात.
वास्तुविशारद तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिका पर्यावरणस्नेही इमारतींना मालमत्ता करात २० टक्के सवलत देण्याच्या विचारात आहे. अधिकाधिक पर्यावरणपूरक इमारती उभ्या राहाव्यात म्हणून हे प्रोत्साहन दिले जाणार आहे. सद्य:स्थितीचा विचार करता चंदिगढ, नोएडा आणि पश्चिम बंगालमध्ये ग्रीन बिल्डिंगला ५ ते १० टक्के वाढीव एफएसआय दिला जातो.
२००३ सालचा विचार करता भारतामध्ये २० हजार चौरस फुटांवर पर्यावरणपूरक बांधकाम करण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे त्यातील २० टक्के बांधकाम मुंबईत झाले होते. लक्षवेधी बाब म्हणजे २०१५ साली ३० लाख चौरस फुटांवर देशभरात पर्यावरणपूरक बांधकाम होत असून, यातील २० टक्के म्हणजे ६ लाख चौरस फुटांवरील बांधकाम मुंबईत होत आहे. (प्रतिनिधी)
ग्रीन बिल्डिंग किंवा ग्रीन टाऊन या संकल्पना आता अमलात येऊ लागल्या आहेत. देशासह राज्यात आणि मुंबईत ग्रीन बिल्डिंगचे प्रमाण कमी असले तरी याबाबत आता जागृती होते आहे. त्यामुळे भविष्यात नक्कीच अधिकाधिक पर्यावरणपूरक शहरे उभे राहतील, अशी आशा असून या माध्यमातून पर्यावरणाला हातभार लागेल.
- चंद्रशेखर प्रभू, वास्तुविशारद