पालिकेच्या उपचारांना कट प्रॅक्टिसचे ग्रहण
By Admin | Updated: May 31, 2014 02:45 IST2014-05-31T02:45:57+5:302014-05-31T02:45:57+5:30
विक्रोळीमधील टागोरनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका प्रसूतिगृहात सोनोग्राफी मशिन सुरू असतानाही गर्भवतींना खाजगी लॅबमध्ये पाठवण्यात येत असल्याने या महिलांना आठपट अधिक रक्कम मोजावी लागत आहे

पालिकेच्या उपचारांना कट प्रॅक्टिसचे ग्रहण
मनीषा म्हात्रे, मुंबई - गरजूंना अल्पदरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून पालिका रुग्णालये उभारली असली तरी काही पालिका रुग्णालयांतील डॉक्टर रुग्णांना विविध चाचण्यांसाठी खाजगी क्लिनिक अथवा लॅबचा मार्ग दाखवित असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. विक्रोळीमधील टागोरनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका प्रसूतिगृहात सोनोग्राफी मशिन सुरू असतानाही गर्भवतींना खाजगी लॅबमध्ये पाठवण्यात येत असल्याने या महिलांना आठपट अधिक रक्कम मोजावी लागत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका प्रसूतिगृहात भांडुप, कांजूर, विक्रोळी, पवई येथील मध्यमवर्गीय गर्भवती महिला मोठ्या प्रमाणावर येत असतात. गुरुवारी सकाळी ९ ते ३ या वेळेत येथे सोनोग्राफी करण्यात येते. गर्भधारणेदरम्यान वारंवार करावयास लागणारी सोनाग्राफी पालिका रुग्णालयात १०० रुपयांमध्ये करण्यात येते. खाजगी रुग्णालयात सोनोग्राफीसाठी ८०० ते १000 रुपयांपासून याची सुरुवात होते. खाजगी रुग्णालयांत आकारण्यात येणारे आठपट अधिक शुल्क टाळण्यासाठी या महिलांना महापालिका रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. मात्र बुधवारी दुपारी आंबेडकर रुग्णालयात सोनोग्राफी मशिन सुरू असतानाही सोनाग्राफीसाठी आलेल्या इरम मन्सूर शेख (१९) आणि सदम इरफान शेख (२१) या दोन गर्भवती महिलांना येथील कर्मचार्यांनी जवळच्या खाजगी लॅबमध्ये सोनोग्राफी करण्यास सांगितले. दोघींनाही अनुक्रमे पाचवा आणि तिसरा महिना सुरू असल्याने त्यांना दिलेल्या तारखेनुसार त्या बुधवारी सोनोग्राफीसाठी आल्या होत्या. कर्मचार्यांनी दिलेल्या खाजगी लॅबमध्ये ८०० रुपये फी असल्याने त्यांनी तेथील कर्मचार्यांना विनवणी करूनही त्यांना येथे सोनोग्राफी होणार नसून तुम्ही खाजगी लॅबमध्ये जा, असे सांगण्यात आल्याची तक्रार सदम शेखने केली. घरकाम करून उदरनिर्वाह करणार्या या दोघींना प्रत्येकी ८०० रुपये भरणे शक्य नसल्याने अखेर त्यांनी घरचा रस्ता धरला. पालिकेच्या प्रसूतिगृहांमधील सोनोग्राफी मशिनमध्ये बाळाची वाढ, त्याची स्थिती, आजूबाजूचे पाण्याचे प्रमाण, प्रतिसेकंदाला होणारे हृदयाचे ठोके, हालचाल आदी माहिती मिळते. सर्वच प्रसूतिगृहांत याची सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून रुग्ण राजावाडी आणि सायन रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याची माहिती सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे डॉ. तानाजी खरात यांनी दिली. त्यात आता पालिका प्रशासनाने प्रसूतिगृहांमध्येही नवीन कलर डॉप्लर मशिन आणल्या आहेत. भांडुप येथील सावित्रीबाई फुले रुग्णालयासह १७ महापालिका प्रसूतिगृहांमध्ये या मशिन्स बसविल्याची माहिती खरात यांनी दिली.