चायनीज खाताय की पोटाच्या आजारांना निमंत्रण देताय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:07 IST2021-09-22T04:07:08+5:302021-09-22T04:07:08+5:30
मुंबई - सध्या चायनीज पदार्थांची सर्वांनाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की, बरेच जण चायनीज खाण्याचाच बेत ...

चायनीज खाताय की पोटाच्या आजारांना निमंत्रण देताय
मुंबई - सध्या चायनीज पदार्थांची सर्वांनाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की, बरेच जण चायनीज खाण्याचाच बेत करतात. चायनीज पदार्थांचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे.
रस्त्याशेजारी फुटपाथवर गल्लोगल्ली मिळणारे चायनीज पदार्थ सहज आणि स्वस्तात उपलब्ध असल्यामुळे तेच खाण्याकडे बहुतेकांचा कल असतो. हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टच्या तुलनेत हे पदार्थ स्वस्तात द्यायचे, तर त्यांचे ‘कुक’ अनेक तडजोडी करतात. निकृष्ट दर्जाचे तेल आणि भाज्या वापरल्या जातात. त्याहीपेक्षा आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात वापरल्या जाणारा अजिनोमोटो पचनसंस्थेसह शरीराचे इतरही नुकसान करू शकतो, असे मत आहारतज्ज्ञ डॉ. उत्कर्षा कौशिक यांनी व्यक्त केले.
चायनीज पदार्थांमध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट, शेजवान सॉस, कृत्रिम रंग, स्टार्च कॉर्न यांसारखे जिन्नस वापरल्यामुळे पचनशक्तीवर ताण येऊन ती बिघडू शकते. भात, बांबूचे मूळ, मशरुम्स, नूडल्स हे चिनी लोकांचे ‘स्टेपल फूड’ आहे, तसे ते आपले नाही. नूडल्स, चिकन किंवा मांस अर्धकच्चे शिजवले गेले तर पचायला हानीकारक आहेत. मैदा आतड्यात जाऊन चिकटत असल्यामुळे त्याचा अतिरेकी वापर घातक आहे. ‘रोडसाइड चायनीज फूड’मध्ये वापरला जाणारा तांदूळही पॉलिश्ड किंवा रिफाइंड असल्याने पचनसंस्थेसाठी हितकर नसतो.
चायनीज पदार्थांमध्ये होणारा स्वस्त कच्च्या मालाचा व कृत्रिम रंगांचा वापर, सॉसेसचा व ‘प्रिझव्र्हेटिव्हज्’चा सढळ वापर, भरपूर तेल वापरले जात असल्यामुळे जास्त प्रमाणात मिळणाऱ्या कॅलरीज हे सर्व शरीरासाठी घातक आहे, असे आहारतज्ज्ञ मानसी गोगटे यांनी सांगितले.
या सर्वांपेक्षा मोनोसोडियम ग्लुटामेटचा सर्रास वापर शरीराचे सगळ्यात जास्त नुकसान करणारा आहे. ते अधिक प्रमाणात वापरले गेल्यास जादा सोडियमवर प्रक्रिया करायला आतड्यांना वेळ लागतो आणि टाकाऊ पदार्थ मूत्रपिंडांमार्फतच बाहेर टाकले जात असल्यामुळे मूत्रपिंडांच्या कार्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका वाढतो. चायनीज पदार्थामध्ये वापरलेली कोबी कच्ची असल्यास ती पचायला जड असते. कोबी आरोग्यदायक वातावरणात उत्पादन झालेली नसल्यास त्यात रोगजंतूंची पैदास होऊ शकते. तीव्र पोटदुखी व पोटाचे इतर विकार होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
‘अजिनोमोटो’च्या अतिरेकापासून सावधान
चायनीज पदार्थांना चव आणणाऱ्या अजिनोमोटो (मोनोसोडियम ग्लुटामेट)च्या अतिरिक्त वापरामुळे या पदार्थाचे सेवन आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते, असे आढळून आले आहे.‘अजिनोमोटो’ नावाची कंपनी तयार करीत असलेल्या ‘फ्लेव्हर एन्हान्सर’चे शास्त्रीय नाव ‘मोनोसोडियम ग्लुटामेट’आहे. सोडियम, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन व ऑक्सिजन ही मूलद्रव्ये असतात. व्हिनेगरप्रमाणेच अजिनोमोटोही आंबवण्याच्या प्रक्रियेतून तयार होते. अनेक भाज्या, सॉसेस, सूप, मांस, मासे, अंडी यामध्ये अजिनोमोटो चांगल्या रीतीने मिसळू शकतो; पण तो जास्त वापरला गेला, तर मात्र पदार्थाची चवच बिघडते असे नाही, तर खाणाऱ्याचे आरोग्यही बिघडू शकते.