वसई-विरारच्या बनातील सुरुंची कत्तल
By Admin | Updated: April 21, 2015 22:58 IST2015-04-21T22:58:05+5:302015-04-21T22:58:05+5:30
वसई-विरारच्या समुद्रकिनाऱ्यावरील सुरुंची बने ही पर्यटकांना आकर्षित करणारी ठरल्यामुळे काही वर्षापूर्वी सामाजिक वनीकरण विभागाने अर्नाळा,

वसई-विरारच्या बनातील सुरुंची कत्तल
वसई : वसई-विरारच्या समुद्रकिनाऱ्यावरील सुरुंची बने ही पर्यटकांना आकर्षित करणारी ठरल्यामुळे काही वर्षापूर्वी सामाजिक वनीकरण विभागाने अर्नाळा, वसई या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात सुरूंची लागवड केली. मात्र, त्यातील झाडांना आगी लावणे तसेच त्यांची रातोरात कत्तल करणे अशा घटना वारंवार घडू लागल्या. त्यामुळे ही बने धोक्यात आली आहेत. त्यामुळेच या सर्व बनांमध्ये महानगरपालिकेने सुरक्षारक्षक नियुक्त करावे, अशी मागणी होत आहे.
वसई विरार शहर महानगरपालिकेने वृक्षसंवर्धनासाठी कोट्यावधींची आर्थिक तरतूद केली आहे. वनखात्याच्या सहकार्याने पूर्व भागातील डोंगरउतार आणि माथ्यावर झाडे लावण्याचा निर्णय तत्कालीन महापौर राजीव पाटील यांनी घेतला होता. तर दुसरीकडे शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाने समुद्रकिनारी असलेल्या परिसरात सुरूच्या झाडाची लागवड करण्याचा निर्णय घेत हजारो झाडे लावली. कालांतराने समाजकंटकांचे सुरूच्या बागांवर लक्ष गेले व त्यांनी सरसकट आगी लावण्याचा सपाटा लावला. सध्या या सुरूच्या बनातील झाडांची कत्तल करण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत. गेल्या २ दिवसात वसईच्या सुरूच्या बनातील अनेक झाडांची कत्तल झाली आहे. वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असूनही पोलीस व स्थानिक प्रशासनाला आजवर एकाही आरोपीला गजाआड करणे शक्य झालेले नाही. (प्रतिनिधी)