Join us  

प्रत्येक पोलीस ठाण्यात आता स्वतंत्र सायबर कक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 2:34 PM

प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र 'सायबर गुन्हे तपास आणि प्रतिबंध कक्ष' स्थापन करण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी घेतला आहे.

मुंबई - प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनमधील 2 जीचे नेटवर्क ४ जीपर्यंत पोहोचलं. फास्ट टेक्नोलॉजीमुळे प्रत्येक काम फास्ट झाले आहे. कॅशलेस व्यवहारात हाच वेग घरातल्या गृहिणीपर्यंत पोहोचला. मोबाइल रिचार्जपासून घरचा बाजारही ऑनलाइन झाला. घरच्या खरेदीपासून कंपन्याच्या आर्थिक व्यवहाराला ऑनलाइन लागलेल्या वेगात भर पडली.  अशात सायबर गुन्हेगारांची वेढा वाढत चालला आहे. 

देशभरावर ओढावलेल्या सायबर गुन्हेगारीच्या सावटावर रोख आणणे पोलिसासमोर आव्हान बनले आहे. याला आळा घालण्यासाठी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र 'सायबर गुन्हे तपास आणि प्रतिबंध कक्ष' स्थापन करण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी घेतला आहे.

मुंबईमध्ये ९३ स्थानिक पोलीस ठाणे आणि एक सायबर पोलीस ठाणे आहे. पोलीस निरीक्षक अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली असलेल्या या कक्षामध्ये दोन साहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक आणि तीन ते चार अंमलदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याचा फायदा सामान्य मुंबईकरांना होणार असून या कक्षामध्ये सायबर गुन्ह्याची तक्रार करता येणार आहे.

प्रत्येक पोलीस ठाण्यात निर्माण करण्यात येणाऱ्या या कक्षासाठी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना सोमवारपासून पुढील पाच दिवस प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आवश्यक असलेली साधन साम्रगी पुरविण्यात येणार असल्याचे सायबर पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले. सायबर गुन्ह्यांच्या माहितीसाठी नागरिकांनी सायबर पोलीस ठाण्याच्या 9820810007 या हेल्पलाइनवर फोन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

टॅग्स :पोलिसपोलीस ठाणेमुंबई