‘ई-पॉस’मुळे अन्नधान्याच्या काळाबाजाराला बसणार रोख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 02:08 IST2019-11-12T02:08:09+5:302019-11-12T02:08:16+5:30
शिधावाटप कार्यालयात ‘ई-पॉस’ मशीन बसविण्यात आल्यापासून अन्नधान्याच्या काळाबाजारावर अंकुश बसविण्यात यश मिळत आहे.

‘ई-पॉस’मुळे अन्नधान्याच्या काळाबाजाराला बसणार रोख
मुंबई : शिधावाटप कार्यालयात ‘ई-पॉस’ मशीन बसविण्यात आल्यापासून अन्नधान्याच्या काळाबाजारावर अंकुश बसविण्यात यश मिळत आहे. त्यानुसार हे व्यवहार शंभर टक्के आॅनलाइन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती शिधावाटप उपनिबंधक सुहास शेवाळे यांनी दिली. कांदिवलीच्या ‘ग’ परिमंडळात शिधावाटप कार्यालयात गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली तसेच दहिसर ही पाच कार्यालये मोडतात. एप्रिल, २०१८ आधी शिधावाटप करणाऱ्या दुकानात अन्नधान्याचा काळाबाजार वाढला होता. त्यामुळे मूळ लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नव्हता. याचा फायदा दुकानदार घेऊन धान्याची विक्री दुप्पट भावाने करायचे. अखेर ८ एप्रिल, २०१८ रोजी ‘ई-पॉस’ मशीन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. या मशीनमुळे आधार कार्ड असलेल्या नागरिकांची बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी करण्यात येते आणि शिधा मिळण्यास पात्र व्यक्तीच त्याचा लाभ मिळतो. हे प्रमाण ७८% वर आले असून मुंबई-ठाण्यात आॅनलाइन धान्यविक्रीत हा विभाग अव्वल ठरला आहे.
>गडबड करणाºया दुकानदारांवर कारवाई!
‘आम्ही ई-पॉस यंत्रणेच्या मदतीने शिधावाटप करीत आहोत. त्यात फेरफार करणाºया दुकानदारांवर कारवाई केली जात आहे. या पद्धतीने शिधावाटप करण्यात ७८% प्रमाणात यश आले असून ते आता १००% करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्याचसोबत केरोसिन बंद असल्याने संबंधित रेशन कार्डधारकाला शोधत गॅसजोडण्या देण्यातही आम्हाला यश आले आहे.’
- सुहास शेवाळे, शिधावाटप उपनिबंधक, ‘ग’ परिमंडळ